देवाच्या द्वारी कशाचीही कमतरता राहू नये, अशी तमाम भाविकांची मानसिकता असते, परंतु याच्याबरोबर उलटा अनुभव जोतिबा मंदिर दर्शन मंडपाच्याबाबतीत येत आहे. ज्या प्रकारे अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखडा प्रदीर्घ काळ लांबला त्याच वाटेवरून जोतिबा मंदिर परिसर विकासाचे काम जात असल्याची शंका येऊ लागली आहे. जोतिबा मंदिर परिसर विकास योजनेतून प्रामुख्याने दर्शन मंडप उभारण्याचे काम हाती घेण्यात आले असून त्याला निधी देखील प्राप्त झाला. २० फेब्रुवारी २०१८ रोजी शिवप्रसाद कन्स्ट्रक्शन यांना कामाची वर्कऑर्डर देण्यात आली. काम पूर्ण करण्याची मुदत दोन वर्षाची होती. ती दि. २० फेब्रुवारी २०२० रोजी संपणार आहे. काम मात्र जोथ्यापर्यंतच आले आहे.
वर्कऑर्डर मिळाल्यानंतर ठेकेदाराने काम सुरू केले. दर्शन मंडपाच्या जागी असणाऱ्या जुन्या इमारतीचे बांधकाम पाडण्यास तब्बल सात महिने गेले. काम सुरू झाले तोवर आणखी एक अपेक्षाभंग झाला. अपेक्षित नसताना पाया खुदाई वीस फुटापर्यंत करावी लागली. त्यामुळे स्ट्रक्चरल ऑडिट करावे लागले. पुन्हा काम सुरू होते ना होते तोच लॉकडाऊन सुरू झाले. दरम्यानच्या काळात ठेकेदाराने जोथ्यापर्यंत काम आणून आरसीसी स्लॅबचे काम पूर्ण केले. लॉकडाऊन उठल्यानंतर काही महिने काम सुरू राहिले, पण गेल्या दीड महिन्यापासून अचानक काम थांबले आहे.
कामाची व्याप्ती अशी असेल-
-वीस हजार चौरस फुटांचे बांधकाम होणार
-ग्राऊंड फ्लोअर आणि त्यावर तीन मजल्यांची इमारत.
-देवस्थान समिती, पोलीस चौकीसह टॉयलेट ब्लॉक समावेश