लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : चंदूर-कबनूर मार्गावरील गेले वर्षभर रखडलेल्या मुख्य रस्त्याचे काम आमदार प्रकाश आवाडे यांच्याहस्ते सुरू करण्यात आले. याबाबत ‘लोकमत’ने वेळोवेळी आवाज उठविला होता. मुख्य स्तराचे काम सुरू झाल्याने ग्रामस्थांतून समाधान व्यक्त होत आहे.
कबनूर-चंदूर मार्गावरील रस्ता गतवर्षी लॉकडाऊनपूर्वी दोन स्तर करण्यात आला होता. त्यानंतर मुख्य स्तर लॉकडाऊनमुळे रखडला होता. परिणामी सर्व वाहनधारक, सायकल चालकांना या मार्गावरून प्रवास अतिशय त्रासदायक होत होता. वाहनांची मोडतोड होण्यासह शारीरिक व्याधींचा त्रास, तसेच किरकोळ अपघात घडू लागले, तर काही महिन्यांत रस्ता उखडू लागला.
याबाबत वेळोवेळी ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत आमदार आवाडे यांनी पाठपुरावा करून प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतील या रस्त्याचे उद्घाटन केले. यावेळी जि. प. सदस्य राहुल आवाडे, पं. स. सदस्य महेश पाटील, सरपंच अनिता माने, उपसरपंच भाऊसाहेब रेंदाळे, मारुती पुजारी, मधुकर मणेरे, सुधीर लिगाडे, नीलेश पाटील, आदींसह सदस्य व विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
फोटो ओळी
०६०४२०२१-आयसीएच-०३
कबनूर-चंदूर मार्गावरील रस्त्याच्या कामाचे उद्घाटन आमदार प्रकाश आवाडे यांनी केले. यावेळी सरपंच अनिता माने, जि. प. सदस्य राहुल आवाडे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.