नंदकुमार ढेरे ।चंदगड : चंदगड, आजरा, गडहिंग्लज या तीन तालुक्यांतील खादी ग्रामोद्योग संघाचा कारभार सध्या एकच कर्मचारी बघतोय. कर्मचारी भरतीच नसल्याने उपलब्ध असलेल्या कर्मचाºयावर सध्या खादी ग्रामोद्योगचा कार्यभार सुरू आहे. शासनाच्या दुर्लक्षामुळे खादी-ग्रामोद्योग संघ सध्या ‘आॅक्सिजन’वर असून, शेवटची घटका मोजत आहे. रिक्त पदे न भरल्यास खादी ग्रामोद्योग बंद पडण्याची शक्यता आहे.
बलुतेदार, ग्रामीण कारागीर यांना रोजगार निर्मिती करण्याकरिता कर्ज उपलब्ध करून देणे या उद्देशाने प्रत्येक तालुक्याला बलुतेदार संस्थांची (खादी ग्रामोद्योग संघ) स्थापना शासनाने १९७२ मध्ये केली. प्रत्येक तालुक्यात कार्यालय स्थापन करून व्यवस्थापक व उपव्यवस्थापक अशी पदे निर्माण केली. कालांतराने सेवानिवृत्तीनंतर रिक्त झालेली पदे भरलीच नाहीत. त्यामुळे जुन्याच कार्यालयातील कामाचा अतिरिक्त कार्यभार उपलब्ध कर्मचाऱ्यावर आहे.
यामुळे कर्जाची वसुली होत नाही. शिवाय शासनाच्या नवीन योजनांची माहिती वेळेत उद्योजकांना व बलुतेदारांना होत नसल्याने कर्जपुरवठा करणे अवघड होते. तालुका कार्यक्षेत्रामुळे एका कर्मचाºयावरच अतिरिक्तबोजा पडत असल्याने कर्ज वसुली व वाटपाचे काम थंडावले आहे. चंदगड, आजरा, गडहिंग्लज तालुक्यांत खादी ग्रामोद्योग संघाने ८७२० सभासद आहेत. या तीनही तालुक्यांत १५ लाखांचे कर्ज वाटप आहेत. शासनाच्या दुर्लक्षामुळे सहा वर्षे कर्ज पुरवठाच केला नाही. चंदगडमध्ये कार्यरत असलेले बी. एम. धनवडे हे एकच कर्मचारी तीन तालुक्यांचा कार्यभार सांभाळत आहेत. प्रत्येक तालुक्याला दोन दिवस वेळ देऊन धनवडे हे काम करीत आहेत.शासनाने रिक्त जागा भरून खादी ग्रामोद्योग संघाला कर्जपुरवठा केला नाही तर आॅक्सिजनवर असलेले हे संघ बंद पडून दिलेली कर्ज बुडण्याचा धोका आहे.