गणपती कोळी -कुरुंदवाड इचलकरंजीतील यंत्रमाग व्यवसाय गेल्या बावीस दिवसांपासून बंद आहेत. त्यामुळे हजारो कामगार बेकार झाले असून, हाताला काम मिळविण्यासाठी ग्रामीण भागाकडे वळत असून शेतामध्ये काम आहे का? अशी विचारणा करत शेतीच्या कामाला लागले आहेत. कामगार संपामुळे शहराची तसेच कामगारांची आर्थिक घडी विस्कटली असून, संप न ताणवता लवकर मिटविण्याची मागणी कामगार वर्गातूनच होत आहे.इचलकरंजी शहराला वस्त्रनगरी म्हणून ओळखले जाते. यंत्रमाग व्यवसायाला सर्वच पूरक व्यवसाय निर्माण झाल्याने जवळपासच्या खेड्यातूनही मोठ्या प्रमाणात यंत्रमाग झाले आहेत. कामगारांची संख्या वाढल्याने त्यांचे संघटन करून नेतृत्व करणारे नेतेही पुढे आले. प्रारंभी संप हा कामगार आणि मालक यांच्यापुरता मर्यादित राहून दोघांच्यामध्ये चांगले संबंध ठेवून कामगार नेतेही समन्वय चर्चा घडवून संप मिटवत असत. मात्र, अलीकडच्या काळात संपाला राजकीय वलय लागल्याने कामगार-मालक यांच्या हितापेक्षा स्वप्रतिष्ठा वाढल्याने कामगार-मालक यांच्यामध्ये कटुता निर्माण होत आहे.सायझिंगच्या कामगारांना किमान वेतन मिळावे या प्रमुख मागणीसाठी गेल्या बावीस दिवसांपासून सायझिंग कामगार संपावर आहेत. त्यामुळे बीम तयार होत नसल्याने यंत्रमाग ठप्प झाला आहे. लूम्स, अॅटोलूम्स, सायझिंग, वार्पिंग, प्रोसेसिंग ही सर्व कारखानदारी एकमेकांवर अवलंबून असल्याने यातील एक घटक बंद पडला, की संपूर्ण यंत्रमागांचा खडखडाट थांबतो. या सर्व कारखान्यांतून सुमारे एक लाखापर्यंत कामगार वर्ग आहे. शिवाय कुरुंदवाड, टाकवडे, अब्दुललाट, शिरदवाड, आदी शहरांच्या परिसरातील यंत्रमाग थांबल्याने कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे.मालकाविरुद्ध लढाई असल्याने रोजचा चरितार्थ चालविण्यासाठी अॅडव्हान्स रूपात रक्कम मागू शकत नाही. तसेच उलाढाल ठप्प झाल्याने यंत्रमाग व्यावसायिकही आर्थिक अडचणीत आहेत. या व्यवसायातील बहुतांश कामगारवर्ग कर्नाटकासह परराज्यातील आहेत. त्यामुळे अनेक कामगार गावाकडे परतत असले, तरी शिक्षणासाठी मुले असलेल्या कामगारांची गोची झाली आहे. एकूणच संपामुळे कामगारांची आर्थिक घडी विस्कटली असून, मालक आणि कामगारांच्या दोघांच्या हिताचा निर्णय घेऊन व्यवसाय चालू करून हाताला काम देण्याची मागणी कामगार वर्गातूनच होत आहे.तुटपुंजा पगाररोजचा चरितार्थ व शिक्षणाचा खर्च चालविण्यासाठी वस्त्रोद्योगातील कामगार आता ग्रामीण भागाकडे शेतीच्या कामाच्या शोधात लागले आहेत. शेतीच्या कामाची सवय नसतानाही घरचा चरितार्थ चालविण्यासाठी नाइलाजास्तव काम करणे भाग पडत आहे. मिळणारे तुटपुंजे पगार घेऊन घरी परतत असताना अनेक कामगारांचे डोळे पाणावत आहेत.
यंत्रमाग कामगार शेतीच्या कामावर
By admin | Published: August 14, 2015 12:00 AM