कोल्हापूर : महाराणी छत्रपती ताराबाई यांचे संगममाउली, सातारा येथील समाधीच्या जीर्णोध्दाराचे काम लवकर पूर्ण केले जाईल. त्यासाठी जिल्हा नियोजनमधून निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी दिली. याबाबत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी सोमवारी (दि. १०) राज्यमंत्री देसाई यांची मरळी (जि. सातारा) येथे जाऊन भेट घेतली.
महाराणी ताराबाई यांचे संगममाउली समाधीच्या जीर्णोद्धाराबाबत साताराचे तत्कालीन पालकमंत्री विजय शिवतारे यांच्याकडे केली होती. त्यानुसार एप्रिल २०१७ मध्ये जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत नावीन्यपूर्ण योजनेंतर्गत समाधी जीर्णाेध्दाराचा प्रस्ताव सादर केला होता. जिल्हा नियोजन समितीच्या सभेत चर्चा होऊन त्यास मान्यता देण्यात आली होती. सदर प्रस्तावास मुख्यमंत्र्यांच्या स्तरावरून मंजुरी दिल्यास निधी दिला जाईल, असे जिल्हा नियोजनकडून कळवण्यात आले.
त्यानुसार २३ डिसेंबर २०१९ रोजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे मागणी केली. त्यावर मुख्यमंत्री ठाकरे यांनी तसे आदेश केले असून, जिल्हा नियोजनमधून निधी मंजूर करण्याबाबत राज्यमंत्री देसाई यांच्याकडे विजय देवणे यांनी मागणी केली. यावर लवकरच निधी लावला जाईल, अशी ग्वाही देसाई यांनी दिली.