लोकमत न्यूज नेटवर्क
मुरगूड : मुरगूड शहरासाठीच्या ८ कोटी ४२ लाखांच्या सुधारित पाणीपुरवठा योजनेचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. येत्या नऊ महिन्यात ही योजना कार्यान्वित होणार असून, शहरवासियांना यामुळे मुबलक पाणी मिळणार आहे. शहरातील विविध भागात चरांची खोदाई करून नळ देण्याचे काम सुरू असून, जलकुंभ उभारण्याची प्रक्रियाही वेगाने सुरू आहे.
मुरगूड शहरासाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान योजनेतून ८ कोटी ४२ लाख खर्चाची सुधारित पाणीपुरवठा योजना मंजूर झाली आहे. परंतु, विद्यमान सरकारने जुन्या सर्व मंजूर योजनांना स्थगिती दिली होती. ही स्थगिती २० एप्रिल रोजी उठविण्यात आली असून, या सुधारित योजनेचा कार्यादेश दिनांक ३० एप्रिल रोजी काढण्यात आला. त्यामुळे या कामाला सुरूवात झाली असून, या कामाचा ठेका कोल्हापूर येथील रविराज इंजिनियर्स यांच्याकडे आहे.
सध्या शहराला रोज १२ लाख लीटर पाण्याचा पुरवठा केला जात आहे. यासाठी पालिका कार्यालयाच्या पाठीमागे १९८१ साली ४ लाख लीटर क्षमतेची, कापशी रोडवर पोतदार कॉलनीत सन १९९६ साली १ लाख लीटर क्षमतेची व सन २०१८ साली शिवाजी पार्क येथे ३ लाख लीटर क्षमतेच्या टाक्या उभारण्यात आल्या आहेत. या टाक्यांद्वारे शहराला दिवसभर पाणी सोडण्यात येत आहे.
नव्या सुधारित ८ कोटी ४२ लाख खर्चाच्या पाणी योजनेचे कामही युद्धपातळीवर सुरू आहे. यामध्ये वेदगंगा नदीमध्ये जॅकवेल उभारणीच्या कामाला सुरूवात झाली आहे. गावभाग पॅव्हेलियन येथे २ लाख लीटर क्षमतेच्या जलकुंभाची उभारणी सुरू आहे. याबरोबरच जनावरांच्या अड्डयात ४ लाख लीटर क्षमतेच्या जलकुंभाची उभारणी प्रगतीपथावर आहे. नव्या योजनेत तीन जलकुंभ तयार होत असून, शहराचे पाच विभाग करून पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. त्यामुळे मुरगूड शहराला कमी वेळेत स्वच्छ व मुबलक पाणी मिळण्याचा मार्गही मोकळा झाला आहे.
फोटो ओळ :-
मुरगूड (ता. कागल) येथील जनावरांच्या अड्डयातील ४ लाख लीटर क्षमतेच्या जलकुंभाची उभारणी वेगाने सुरू आहे.
फोटो पाठवत आहे