लोकमत न्यूज नेटवर्क
हेरले : राजर्षी शाहू महाराजांनी उपेक्षित समाजाला न्याय देण्याचे काम केले. शिक्षणावर लक्ष केंद्रित करून खेड्यापाड्यांतील मुलांना शिक्षणासाठी कोल्हापुरात राहण्याची व्यवस्था केली. त्यासाठी प्रत्येक समाजाकरिता वसतिगृहे, कुस्तीसाठी क्रीडांगण तर व्यापारासाठी बाजारपेठ उभी केली. तेच खरे रचनाकार होते. याचा अधिक विस्तार व्हायला पाहिजे होता; पण ते स्वप्न आता हुमायून मुरसल यांनी ‘सेंटर फॉर रेनेसाँ’च्या माध्यमातून साकारले आहे, असे मत ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले यांनी रविवारी व्यक्त केले. सेंटर फॉर रेनेसाँच्या पायाभरणी समारंभप्रसंगी ते बोलत होते.
हेरले (ता. हातकणंगले) येथे मुस्लिम फौंडेशन फॉर रेनेसाँच्या वतीने सर्वधर्मीय मुस्लिम विद्यापीठाची उभारणी करण्यात येणार आहे. या विद्यापीठाचा पायाभरणी समारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.
वसंत भोसले म्हणाले, समाजातील एखाद्या उपेक्षित घटकाला वंचित ठेवून राष्ट्र मोठे होऊ शकत नाही. राष्ट्र बलवान करायचे असेल तर सर्व वंचित घटकांना घेऊन काम केले पाहिजे. ज्ञान आणि संशोधन हे आपले भांडार झाले आहे. समाजात बदल घडविण्यासाठी मूलभूत ज्ञान देण्याची गरज आहे. हे विद्यापीठ उभे करण्यासाठी समाजाने आर्थिक मदत केली पाहिजे. त्यासाठी माझ्या उत्पन्नातील पाच टक्के वाटा आयुष्यभर या संस्थेसाठी देत आहे. चांगल्या कार्यासाठी ‘लोकमत’ हे नेहमी व्यासपीठ आहे. तुमच्यासाठीही ‘लोकमत’ कायम उपलब्ध राहील.
हुमायून मुरसल म्हणाले, मुस्लिम समाजासह वंचित घटकांना शैक्षणिक बाबतीत न्याय मिळाला नाही. या सर्वधर्मीय वंचित घटकांसाठी मुस्लिम फौंडेशन फॉर रेनेसाँच्या वतीने मुस्लिम विद्यापीठाची उभारणी करण्यात येत आहे.
यावेळी कॉ. संपत देसाई, काॅ. धनाजी गुरव, काॅ. चंद्रकांत यादव, दिलावर बागलकोटी, हाजी नदाफ, खलील अन्सारी, ॲड. अशोकराव साळोखे, रेहान मुरसल, उपसरपंच राहुल शेटे यांनी मनोगत व्यक्त केले. नियाज सौदागर, सलीम बारगीर, महंमद सय्यदमुल्ला, रजाक नाईक, गौस खतीब, शौकत मगदूम, मुल्ला पठाण, बशीर पठाण, डॉ. सूरज तांबोळी, शौकत मुतवल्ली, मुनीर अहमद, मौलाना फैयाजुल हक, ॲड. ए. बी. मुरसल, नासीर मोमीन, मल्लिका शेख, डॉ. शाहीन देसाई, समीर बागवान, खालीद मुतवल्ली, यासीन जमादार, डॉ. अब्दुलमजीद इनामदार, इम्तियाज पठाण, फिरोज नाईक, मुबारक शेख, रशीद बागवान, सिराज मुजावर, आदी उपस्थित होते. अलसना फनसोपकर यांनी स्वागत केले. मुबिन मनगोळी यांनी आभार मानले.
फोटो : हेरले (ता. हातकणंगले) येथे सेंटर फॉर रेनेसाँ या विद्यापीठाच्या पायाभरणी समारंभप्रसंगी ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले यांनी मार्गदर्शन केले.