कोल्हापूर : मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश मोहित शहा यांनी मंगळवारी कोल्हापुरात होणाऱ्या ‘सर्किट बेंच’बाबत निर्णय न घेता सेवानिवृत्ती घेतली. त्याच्या निषेधार्थ गुरुवारी दुसऱ्या दिवशीही जिल्ह्यातील वकिलांनी काम बंद ठेवत आंदोलन केले. खंडपीठ कृती समितीने आवाहन केल्यामुळे कोल्हापूरसह सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व सोलापूर या सहा जिल्ह्यांतील न्यायालयीन कामावर वकिलांनी तीन दिवसासाठी बहिष्कार टाकला आहे. इचलकरंजीत रास्ता रोको इचलकरंजी : इचलकरंजी बार असोसिएशनच्या वकीलांनी गुरुवारी रास्ता रोको आंदोलन करत सर्किट बेंचची मागणी केली. आज, शुक्रवारी शहरातील प्रमुख मार्गांवरून रॅली काढण्यात येणार आहे. असोसिएशनने तीन दिवस कामकाजापासून अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी अध्यक्ष सुहास मुदगल, पी. जी. लोहार, राजकुमार निर्मळ, विश्वास चुडमुंगे, माधुरी काजवे यांच्यासह सदस्य सहभागी झाले होते. जयसिंगपुरात निदर्शने जयसिंगपूर : सर्किट बेंचच्या मागणीसाठी आज, गुरूवारी येथील बार असोसिएशनच्यावतीने प्रथमवर्ग न्यायालयात निदर्शने करण्यात आली. दरम्यान, उद्या, शुक्रवारी सकाळी अकरा वाजता शहरातून रॅली काढण्यात येणार असून यामध्ये सर्व राजकीय पक्ष व सघटनांनी सहभागी व्हावे, असे आवाहन असोसिएशनने केले आहे. यावेळी कोल्हापूरमध्ये सर्किट बेंच स्थापन करण्याचा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमुर्ती मोहित शहा यांनी प्रलंबित ठेवून फसवणून केल्याचा आरोप करून त्यांच्या निषेधाच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या. आज दिवसभर कामकाज ठप्प राहिले. कोल्हापूरचे पाणी दाखवू : प्रकाश आबिटकर गारगोटी : कोल्हापूर खंडपीठप्रश्नी मुंबई उच्च न्यायालय जर कोल्हापूरकरांच्या भावनेशी खेळणार असेल तर त्यांना कोल्हापूरचे पाणी दाखवावेच लागेल, असा इशारा आमदार प्रकाश आबिटकर यांनी दिला. गारगोटी येथे खंडपीठप्रश्नी वकिलांच्या आंदोलनप्रसंगी ते बोलत होते. आज गारगोटी बार असोसिएशनच्या वकिलांनी न्यायालयातून मोर्चा काढत तहसीलदार शिल्पा ओसवाल यांना निवेदन सादर केले. यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य राहुल देसाई यांनी खंडपीठसंदर्भात लढा निर्णायक टप्प्यापर्यंत पोहोचला आहे. उच्च न्यायालयाने तातडीने निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलनाला सामोरे जावे लागेल, असा इशारा दिला. यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रवीणसिंह सावंत, जिल्हा परिषदेचे सदस्य राहुल देसाई, कॉ. दत्ता मोरे, बाजार समितीचे संचालक नाथाजी पाटील, अॅड. के. एस. पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पंडितराव केणे यांची भाषणे झाली. या आंदोलनात काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शामराव देसाई, विश्वनाथ कुंभार, जि. प. सदस्य प्रा. अर्जुन आबिटकर, विश्वनाथ घाटगे, अॅड. पी. बी. सापळे, अॅड. संजय भोसले, घनश्याम ठाकूर, संग्रामसिंह कडव, अल्केश कांदळकर, वकील उपस्थित होते.
खंडपीठासाठी दुसऱ्या दिवशीही काम ठप्प
By admin | Published: September 11, 2015 1:04 AM