चंदगड : वर्षभरापूर्वी अनेक आंदोलने करून कागणी ते कालकुंद्री या दोन कि.मी. रस्त्याचे काम ग्रामस्थांनी सुरू करायला लावले होते. मात्र, ठेकेदाराने फक्त खडीकरण (बीबीएम) केले आहे. वर्ष उलटले तरी त्यावर डांबरीकरणाचा पत्ता नाही. ठेकेदाराने केलेले खडीकरण पूर्णत: उखडून गेले आहे. त्यामुळे प्रवासी व वाहनधारकांत तीव्र संताप व्यक्त होत आहे.
कालकुंद्री, कागणी परिसरातील ग्रामस्थांनी याप्रश्नी आंदोलनाचा इशारा दिला आहे. चंदगड तालुक्याच्या पूर्व भागातील कागणी ते कालकुंद्री हा अत्यंत महत्त्वाचा व वर्दळीचा रस्ता दोन वर्षांपासून डांबरीकरणाअभावी रखडला आहे.
गडहिंग्लज, आजरा ते बेळगाव मुख्य मार्गाला कुदनूर, राजगोळी, दड्डी ते हत्तरगी येथे पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा महत्त्वाचा रस्ता आहे. १५ वर्षे दुरवस्थेत असलेल्या या रस्त्याप्रश्नी शिवसेनेसह विविध संघटनांनी अनेकदा आंदोलने केल्यानंतर बांधकाम विभागाने नवीन पद्धतीने हा रस्ता डिसेंबर २०१८ मध्ये केला होता. २०१९ मधील अतिवृष्टी व पुरात बांधकाम विभागाच्या नव्या ‘मेथड’सह रस्त्याचाही फज्जा उडाला. पुन्हा आंदोलनानंतर नव्याने रस्त्याचे काम सुरू झाले. गेल्या मार्च महिन्यात खडीकरण व बीबीएमनंतर डांबरीकरण रखडले आहे. तेही उखडल्याने रस्ता वाहतुकीस धोकादायक बनला आहे.
दोन दिवसांत साखर कारखाना हंगाम संपल्यानंतर ऊस वाहतूक थांबून कामातील अडथळेही कमी होतील. त्यामुळे संबंधित विभागाने २० मार्चपूर्वी डांबरीकरण व साईड पट्टयांचे काम सुरू करावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
-----------------------
* फोटो ओळी : कागणी ते कालकुंद्री (ता. चंदगड) दरम्यानच्या रस्त्याची अशी दुरवस्था झाली आहे.
क्रमांक : १४०२२०२१-गड-०४