रमेश साबळे । -लोकमत न्यूज नेटवर्ककसबा तारळे : राधानगरी तालुक्यात खरीप हंगामातील रोप लावणीसह शेतीच्या मशागतीसाठी लागणारी अवजारे तयार करण्यासाठी बारा बलुतेदार असणाऱ्या सुतार शाळेत कामांची घाई उडाली आहे. या भागात अजूनही ही सर्व अवजारे ‘धान्य स्वरूपातच करून घेतली जातात.राधानगरी तालुक्यातील शेतीचा बहुतांश भाग डोंगराळ आहे. त्यामुळे शेतीसाठी या भागात तांत्रिक अवजारांचा फारसा उपयोग होत नाही. त्यामुळे अजूनही पारंपरिक लाकडी अवजारांचाच वापर शेतकरी करतात. त्यामुळे खरिपांसाठी नांगरी, घुट्टा, जू, दिंड, कुरपण, नुमने, मुठव्या, आदी अवजारांसह विळा, कोयता, कुदळ, टिकाव यांना दांडा बसविण्याची घाई सुतार शाळेत उडाली आहे. सुतारांनी लागेल ती अवजारे तयार करून वर्षभरामध्ये द्यायची आणी बळिराजाने आपल्या रानातून पिकविलेले धान्यरूपात ‘बैतं’ सुताराला द्यावयाचे या ठिकाणी पैशांचा प्रत्यक्ष व्यवहार न चालता धान्य स्वरूपात वस्तूंची आजही देवाणघेवाण चालत आहे. त्यामुळेच येथील जनता एकमेकांवर अवलंबून असते.म्हणून आजही या आधुनिक काळात बळिराजा आणी सुतार यांच्यामध्ये ‘बैतं’ ही पद्धत टिकून आहे. काहीअंशी तांत्रिक मशिनरीने या व्यवसायावर मर्यादा आणलेल्या असल्याने जीवन जगणे मुश्कील होऊन बसले आहे.
राधानगरी तालुक्यात सुतार शाळेत कामांची घाई
By admin | Published: June 24, 2017 12:09 AM