कोल्हापूर : पंचगंगा नदीवरील नवीन शिवाजी पुलाचे बांधकामच बेकायदेशीर असल्याचा अहवाल पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी केंद्र सरकारला दिल्याची धक्कादायक माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. केंद्रीय सांस्कृतिक मंत्र्यांना विनंती करून कायद्यातील कलम बदलण्यासाठी आपला प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले. शिवाजी पूल बांधकामाच्या आडवे येणारे वृक्ष तोडण्यास पुरातत्त्व विभागाने परवानगी दिली नसल्याने काम थांबले आहे. याबाबत खासदार महाडिक यांना विचारले असता, शिवाजी पुलाच्या रेंगाळलेल्या बांधकामाबाबत आपण केंद्रीय पुरातत्त्व अधिकारी नवनाथ सोनी यांच्याशी चर्चा केल्यानंतर मुळात हा पूलच बेकायदेशीर बांधल्याचे सांगत आपण बांधकामास मंजुरी दिली तर तीन वर्षे शिक्षा होईल, असे सांगितले. सार्वजनिक बांधकाम विभाग कोल्हापूरच्या अधिकाऱ्यांनाही चर्चेसाठी दिल्लीत बोलावले होते. कलम काढून टाकण्यासाठी प्रयत्नपुरातत्त्व विभागाची मानसिकता पाहून आपण थेट केंद्रीय सांस्कृतिक मंत्री महेश शर्मा यांची भेट घेऊन सार्वजनिक हिताचा विचार करून पुलाच्या बांधकामास मान्यता द्यावी, अशी मागणी केली. मंत्री शर्मा यांनी तातडीची बैठक बोलावून पुरातत्त्व कायद्यातील संबंधित कलम काढून टाकावे, तसा प्रस्ताव मंत्रालयाकडे सादर करावा, अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. त्यामुळे पुलाच्या बांधकामाबाबत लवकरच तोडगा निघेल, असे खासदार महाडिक यांनी सांगितले.
शिवाजी पुलाचे काम बेकायदेशीर
By admin | Published: May 18, 2016 12:37 AM