प्रवीण देसाईकोल्हापूर : पंचगंगा नदीवरील बहुचर्चित पर्यायी शिवाजी पुलाच्या कामाचा मार्ग खुला करण्यास राष्टÑपती रामनाथ कोविंद यांचा अध्यादेश हा एक पर्याय समोर आला आहे. सर्वच पातळीवर लोकप्रतिनिधींसह प्रशासकीय यंत्रणांनी प्रयत्न करूनही रखडलेल्या कामाला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे अखेरचा प्रयत्न म्हणून राष्टÑपतींच्या अधिकारात पुलाच्या कामाला परवानगी देता येऊ शकते; परंतु यासाठी खासदार संभाजीराजे, राजू शेट्टी, धनंजय महाडिक यांनी राष्टÑपतींची भेट घेऊन हा प्रश्न त्यांना पटवून देण्याची गरज आहे.शिवाजी पुलाचे ८० टक्के काम पूर्ण झाले असून आतापर्यंत १० कोटी रुपये खर्च झाले आहेत; परंतु उर्वरित काम हे पुरातत्त्व विभागाच्या परवानगीअभावी रखडले आहे. खासदार धनंजय महाडिक व खासदार संभाजीराजे यांनी पाठपुरावा केल्याने पुरातत्त्व विभागाकडून आलेल्या अडथळ्यांवर लोकसभेतून मार्ग निघाला; पण राज्यसभेचे कामकाज न चालल्याने अंतिम मंजुरी मिळाली नाही. जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनीही हे पुलाचे काम ‘आपत्कालीन बाब’ म्हणून सुरू करता येऊ शकेल काय? याबाबत आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या संचालकांकडे गत महिन्यात मार्गदर्शन मागविले आहे. याबाबत अद्याप उत्तर आलेले नाही.त्यामुळे शेवटचा पर्याय म्हणून थेट राष्टÑपती आपल्या अधिकारात अत्यावश्यक पुलाच्या कामास अध्यादेशाद्वारे परवानगी देऊ शकतात; परंतु यासाठी जिल्ह्यातील तिन्ही खासदारांनी राष्टÑपतींची भेट घेऊन हा प्रश्न पटवून देण्याची गरज आहे तसेच केंद्र सरकारनेही या अध्यादेशासाठी पाठपुरावा करण्याची आवश्यकता आहे, असे सूत्रांनी सांगितले.
राष्ट्रपतींनी अध्यादेश काढल्यास कोल्हापुरातील शिवाजी पुलाचे काम मार्गी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 02, 2018 5:40 AM