कोल्हापूर : महापालिकेवर भगवा फडकविण्यासाठी कामाला लागा, असे आवाहन खासदार संजय मंडलिक यांनी सोमवारी शिवसैनिकांना केले. आरटीओ ऑफिस येथे शिवसेना प्राथमिक सदस्य नोंदणी अभियानाची सुरुवात आणि नागाळा पार्क शिवसेना शाखा उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.
मंडलिक म्हणाले, महापालिकेची सत्ता शिवसेनेच्या हातात येण्यासाठी आतापासून कामाला लागणे गरजेचे आहे. शिवसेना सदस्य नोंदणीसोबत मतदार नोंदणी अभियानही यशस्वीपणे राबवा. सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवा. प्रत्येक घरात शिवसैनिक असण्यासाठी प्रभावी सदस्य नोंदणी करा. यावेळी परिसरातील ज्येष्ठ नागरिक शरद सामंत यांनी मनोगत व्यक्त केले. जिल्हाप्रमुख विजय देवणे, शाखाप्रमुख संजय जाधव, राजू जाधव, शुभांगी पोवार, शशिकांत बिडकर, कमलाकर जगदाळे, चंदू भोसले, राजू यादव, अभिजित बुकशेट, आदी उपस्थित होते.
चौकट -
‘मातोश्री’शी गद्दारी करणाऱ्यांना ‘धडा’
शिवसेनेचे हात धरून राजकारणात आले आणि मोठे झाले त्यांना गद्दारी केल्यामुळे काय होते हे पदवीधर निवडणुकीत समजले आहे. ‘मातोश्री’शी गद्दारी करणाऱ्यांना शिवसैनिक धडा शिकविल्याशिवाय स्वस्त बसत नसल्याचे संजय पवार यांनी सांगत भाजपवर निशाणा साधला.
चौकट
राजेश क्षीरसागर यांनाही टोला
‘मातोश्री’वरून येणारा आदेश सर्वमान्य असतो. कोल्हापूर महापालिकेची निवडणुकीसंदर्भात तसेच आहे. स्वबळ की महाविकास आघाडी याबाबत अद्यापही निर्णय नाही. तरीही अमूक जागा लढवू असा निर्णय कोल्हापुरातून कोणीही घेऊ शकत नाही. कोणी काहीही म्हणला तर त्याकडे लक्ष देऊ नका, असा टोला संजय पवार यांनी माजी आमदार राजेश क्षीरसागर यांचे नाव न घेता लगावला.
फूटपाथवर बेकायदेशीर केबिन टाकण्याचा ‘धंदा’
शहरातील प्रत्येक फूटपाथवर अतिक्रमण झाले आहे. यामधून महापालिकेला एक रुपयाचेही उत्पन्न नाही. या उलट शहराचे विद्रुपीकरण होत आहे. काहींचा बेकायदेशीर केबिन टाकण्याचा धंदा सुरू आहे. त्यांना काही नगरसेवकांचाही वरहदस्त असल्याचा आरोप संजय पवार यांनी केला. यावर प्रशासकांनी तातडीने कारवाई करावी. आता कोणीही नगरसेवक अाडवे येणार नाही. तसेच आरटीओ ऑफिस येथे केबिनच्या मागून अवैध व्यवसाय केल्यास त्यांची केबिन रस्त्यावर टाकू, असा इशाराही त्यांनी दिला.
फोटो : ०७१२२०२० कोल शिवसेना सभासद नोंदणी १
फोटो : ०७१२२०२० कोल शिवसेना सभासद नोंदणी २
ओळी : कोल्हापुरातील आरटीओ ऑफिस येथून शिवसेना सदस्य नोंदणी अभियानाला सोमवारी सुरुवात झाली. येथील शिवसेनेच्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी खासदार संजय मंडलिक, संजय पवार, विजय देवणे, आदी उपस्थित होते.