सेनापती कापशी: भाजप सरकारच्या काळात निधीअभावी रखडलेल्या सेनापती कापशी (ता. कागल) येथील सरसेनापती संताजी घोरपडे स्मारकास गती मिळून लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल, असा विश्वास सरसेनापती संताजी घोरपडे स्मारकाचे सदस्य शशिकांत खोत यांनी व्यक्त केला. सोमवारी यासंदर्भात मंत्रालयात आयोजित केलेल्या बैठकीनंतर ते बोलत होते.
खोत म्हणाले, २०१२ मध्ये मंत्री हसन मुश्रीफ व आपण स्वत: कापशी येथे सरसेनापती संताजी घोरपडे यांचे स्मारक उभारण्यासाठी शासकीय स्तरावर निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले. त्यानुसार शासनाने सुरुवातीला पाच कोटी रुपयांचे बजेट मंजूर केले. त्याप्रमाणे या स्मारकाची २०१३ पासून बांधणी सुरू झाली; परंतु निधी उपलब्ध झाला नाही. हसन मुश्रीफ २०२० मध्ये पुन्हा मंत्री झाले व मंत्री होताच त्यांनी सरसेनापती संताजी घोरपडे स्मारकासाठी स्वतःच्या ग्रामविकास खात्यातून दहा कोटी रुपये निधी देण्याचा प्रस्ताव तयार केला व तो मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मान्यतेसाठी पाठवला.
त्यानुसार वित्त विभागाचे मुख्य सचिव राजगोपाल देवरा यांनी स्मारकाबाबतच्या प्रस्तावाबाबत संबंधित सर्व विभागांच्या खात्याच्या खातेप्रमुखांची बैठक सोमवारी मंत्रालयात बोलावली होती.
फोटो: सेनापती कापशी (ता. कागल) येथील रखडलेल्या सरसेनापती संताजी घोरपडे स्मारकाचे काम पुन्हा सुरू करण्यासाठी मंत्रालयात आयोजित केलेल्या बैठकीस वित्त विभागाचे प्रधान सचिव राजगोपाल देवरा, तहसीलदार शिल्पा ठोकडे, शशिकांत खोत, सुनील चौगले, वित्त व बांधकाम विभागाचे मुख्य अधिकारी उपस्थित होते.