कोल्हापूर : पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यासंदर्भात कोणकोणत्या उपाययोजना राबविल्या आहेत, याबाबतचे प्रतिज्ञापत्र तयार करण्याचे तसेच त्यासाठी आवश्यक कागदपत्रे जमविण्याचे काम महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या येथील विभागीय कार्यालयातर्फे सुरू आहे. यासंबंधीची सुनावणी १९ जानेवारीला होणार आहे. पंचगंगा नदीच्या प्रदूषणासंदर्भात दाखल झालेल्या याचिकांवर एकत्रित सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाचे न्या. अभय ओक यांच्यासमोर सुरू असून, प्रदूषण रोखण्यासंदर्भात दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार कोणकोणत्या उपाययोजना राबविल्या आहेत, कोल्हापूर महापालिका, इचलकरंजी नगरपालिका, जिल्हा परिषद, भोगावती सहकारी साखर कारखाना, गोकुळ शिरगाव व शिरोली औद्योगिक वसाहत, कागल पंचतारांकित वसाहतीमधील सांडपाण्यापासून होणाऱ्या प्रदूषणाबाबत कोणकोणत्या उपाययोजना राबविण्यात आल्या आहेत, त्यांचे सामुदायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्रे कार्यान्वित आहेत किंवा नाहीत, याबाबतची माहिती, तसेच न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन केले जाते किंवा नाही, याबाबतची माहिती प्रतिज्ञापत्राद्वारे सादर करावी, असे न्यायालयाने म्हटले होते. त्यानुसार राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने उपलब्ध माहितीनुसार प्रतिज्ञापत्र तयार करण्याचे काम सुरू केले असून अन्य जबाबदार घटकांनाही तशा सूचना दिल्या आहेत. आवश्यक त्या कागदपत्रांची जमवाजमव करण्यात येत आहे. १५ जानेवारीला हे प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर केले जाणार असल्याचे विभागीय अधिकारी एस. एस. डोके यांनी सांगितले.पंचगंगा नदीच्या प्रदूषणासंदर्भात इचलकरंजी येथील दत्तात्रय माने यांच्यावतीने अॅड. धैर्यशील सुतार, तर कोल्हापुरातील प्रजासत्ताक सामाजिक संघटनेतर्फे अॅड. राहुल वाळवेकर हे न्यायालयातील कामकाज पाहत आहेत. (प्रतिनिधी)
पंचगंगा प्रदूषण प्रतिज्ञापत्र तयार करण्याचे काम सुरू
By admin | Published: January 08, 2015 12:43 AM