कोपार्डे : बालिंगा येथील भोगावती नदीवर असणाऱ्या ब्रिटिशकालीन पुलाच्या मजबुतीकरणाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने सुरू केले आहे. यासाठी ३३ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. या पुलाच्या मजबुतीकरणाचे काम गेल्या कित्येक दिवसांपासून रखडले होते. त्यामुळे लोकमतने बालिंगा पुलाच्या मजबुतीकरणाचे काम कधी या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करताच प्रशासन खडबडून जागे झाले असून त्यांनी मजबुतीकरणाचे काम हाती घेतले आहे. कोल्हापूर -गगनबावडा मार्गावर बालिंगा येथे १३५ वर्षांपूर्वीचा ब्रिटिशकालीन पूल आहे. नदीच्या मध्यभागी असणाऱ्या पिलरला पाण्यात असणाऱ्या भागात मोठी फट असल्याचे स्पष्ट झाल्याने पुढे धोका नको म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाने दक्षता म्हणून या पुलाच्या मजबुतीकरणाचे काम २०१९ मध्ये चिपळूणच्या प्रभू इंजिनिअरिंग कंपनीकडे दिले होते.
पण, गेल्या दोन वर्षांपासून हे काम रखडल्याने लोकमतने या विरोधात आवाज उठविला होता. याची दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने नव्याने निविदा काढून या पुलाच्या मजबुतीकरणाच्या कामासाठी ३३ लाखांचा निधी मंजूर केला आहे. नुकतेच याचे काम सुरू झाले असून आधुनिक पद्धतीने अंडर वॉटर मायक्रो कॉँक्रिटीकरण होणार आहे.
कोट : पुलाचे काम करताना अंडर वॉटर सिस्टिमचा वापर करून मायक्रो काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. याद्वारे या पिलरला काँक्रिट जॅकेट होणार असल्याने पुराच्या प्रवाहाचा धोका कमी होणार असून पुलाचे आयुष्य वाढणार आहे.
रोहन येडगे, शाखा अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग
फोटो
: ०१ बालिंगा पूल
बालिंगा येथील ब्रिटिशकालीन पुलाच्या मजबुतीकरणाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने सुरू केले आहे.