लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : जिल्ह्यातील ८८१३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे काॅन्टॅक्ट ट्रेसिंग अजूनही झाले नसून, याची पूर्तता करणे आता महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदेसमोर आव्हान बनले आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने यांनी याबाबत सर्व गटविकास अधिकाऱ्यांना पत्र पाठवून तातडीने हे ट्रेसिंग करण्याबाबतच्या सूचना दिल्या आहेत.
जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा आकडा हा ५० हजारांहून अधिक नोंदविला गेला आहे. मात्र, त्यापैकी ४४ हजार २९६ रुग्णांच्या काॅन्टॅक्ट ट्रेसिंगचे काम पूर्ण झाले आहे; परंतु ८३१३ रुग्णांच्या ट्रेसिंगचे काम अजूनही बाकी आहे. यामध्ये सर्व नगरपालिका आणि बाराही तालुक्यांचा समावेश असून, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने यांनी याबाबत सर्वच गटविकास अधिकाऱ्यांना पत्र पाठवून हे काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
कोल्हापूर जिल्ह्याचा राज्यस्तरावरून काॅन्टॅक्ट ट्रेसिंगचा आढावा घेतला असता, जिल्ह्यातील हे काम कमी झाल्याबद्दल राज्यस्तरावरूनही नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. प्रती रुग्ण हायरिस्क १५ आणि लो रिस्क २० या पद्धतीने काॅन्टॅक्ट ट्रेसिंग करण्याच्या सूचना या पत्रामध्ये देण्यात आल्या आहेत. कोविडबाधित रुग्ण आणि त्यांच्या संपर्कातील सर्व नातेवाईक, नागरिक यांची माहिती १०० टक्के अपलोड झाली पाहिजे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
चौकट
बाहेरील जिल्ह्यातील २२०० जणांचा समावेश
या शिल्लक राहिलेल्या काॅन्टॅक्ट ट्रेसिंगमध्ये सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सांगली जिल्ह्यांतील तसेच निपाणी, चिक्कोडी, संकेश्वर तालुक्यांतील अनेक पॉझिटिव्ह रुग्णांचा समावेश आहे. या सर्वांनी महाराष्ट्रात जरी स्वॅब दिला असला, तरीदेखील त्यांचे ट्रेसिंग हे त्या त्या जिल्ह्यातून होणार असल्याने ही २२०० नावे कोल्हापूर जिल्ह्याच्या यादीत दिसत आहेत.
चौकट
गेल्यावर्षीपासूनची नावे
गेल्या मार्चपासूनची नावे अजूनही अपलोड करायची राहिली आहेत. जेव्हा रुग्णसंख्या अधिक होती, तेव्हाची नोंदणी झाली आहे. मात्र, नोव्हेंबर, डिसेंबर २०२०, जानेवारी २०२१ या महिन्यांत रुग्णसंख्या खूपच कमी आली. तेव्हाची काॅन्टॅक्ट ट्रेसिंगची नावे अपलोड करणे राहिले आहे.
कोट
अशा पद्धतीने काॅन्टॅक्ट ट्रेसिंग होणे किंवा झाले असले, तरी ती नावे अपलोड करणे बाकी आहे. याबाबत २० एप्रिलपर्यंत हे काम संपविण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत.
मनीषा देसाई,
उपमुख्य कार्यकारी अधिकारी, सामान्य प्रशासन विभाग, जिल्हा परिषद, कोल्हापूर