महिला सबलीकरणाचे काम कौतुकास्पद
करवीर पंचायत समिती सभापती अश्विनी धोत्रे
**वाकरे ग्रामपंचायतीकडून महिला कौशल्य विकास प्रशिक्षण उद्घाटन कार्यक्रम.
लोकमत न्यूज नेटवर्क
कोपार्डे : वाकरे (ता. करवीर) ग्रामपंचायतीने महिलांसाठी विविध प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्याचा घेतलेला निर्णय कौतुकास्पद आहे. ग्रामीण भागात शेतात राबणाऱ्या महिलांची कार्यकुशलता वाढविणे गरजेचे असल्याचे मत करवीर पंचायत समितीच्या सभापती अश्विनी धोत्रे यांनी व्यक्त केले.
वाकरे ग्रामपंचायतीकडून अंगणवाड्यांना तिजोरीचे वाटप करण्यात आले तसेच गावातील महिलांना कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत ब्युटी पार्लर प्रशिक्षण देण्याचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या अश्विनी धोत्रे यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्या रसिका पाटील, सदस्य सुभाष सातपुते, पंचायत समिती सदस्या यशोदा पाटील उपस्थित होत्या.
यावेळी सरपंच वसंत तोडकर म्हणाले की, गावाचा सर्वांगिण विकास महत्वाचा आहे. यात महिलांनी सहभाग घेतला तर गती मिळू शकते, याचसाठी अंगणवाडी सेविका, आशा सेविका यांना प्रोत्साहन देण्याचे काम ग्रामपंचायतीकडून करण्यात येत आहे. १४ व्या वित्त आयोगातून तिजोरी वाटप तसेच गावातील महिलांना कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षण देण्यात येत आहे. ग्रामपंचायतीकडून यापुढेही असे महिलाभिमुख उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी शाहू पुरस्कार मिळाल्याबद्दल रसिका पाटील यांचा उपसरपंच शारदा पाटील यांनी तर सुभाष सातपुते यांचा सदस्य विजय पोवार यांनी सत्कार केला. ग्रामपंचायत सदस्य सुमन पाटील, सिंधूताई कांबळे यावेळी उपस्थित होत्या. ग्रामविकास अधिकारी संभाजी पाटील यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.
(फोटो)
वाकरे (ता. करवीर) येथे अंगणवाड्यांना तिजोरीचे वाटप सभापती अश्विनी धोत्रे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य सुभाष सातपुते, रसिका पाटील, सरपंच वसंत तोडकर, ग्रामविकास अधिकारी संभाजी पाटील उपस्थित होते.