मुख्यालयातील ७०० कर्मचाऱ्यांपैकी १६ विभागांमधील १५ टक्के कर्मचारी उपस्थित ठेवण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने यांनी दिल्या आहेत. आरोग्य विभागाच्या सर्वच कर्मचाऱ्यांना उपस्थित राहण्याच्या सूचना आहेत. पंचायत समिती स्तरावरही याच पद्धतीने नियोजन करण्यात आले आहे.
उर्वरित कर्मचाऱ्यांनी घरातूनच काम करावयाचे असून, कोणत्याही परिस्थितीमध्ये मुख्यालय सोडू नये अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गरज पडल्यास कोणाही कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या ठिकाणी बोलाविण्यात येणार आहे. अशा वेळी नकार देणाऱ्यांवर २००५ च्या आपत्ती कायद्यानुसार कारवाई करण्याचा इशाराही या परिपत्रकातून देण्यात आला आहे.
शासनानेच आता कडक लॉकडाऊनचे आदेश काढल्यामुळे जिल्हा परिषदेकडे येणारी गर्दीही कमी होणार आहे. सध्या सुमारे सव्वाशेहेहून अधिकजण जिल्हा परिषदेत दिवसभरात येतात अशी नोंद आहे.
चौकट
‘गोकुळ’मुळे पदाधिकारी अनुपस्थित
‘गोकुळ’च्या निवडणुकीचा प्रचार आणि जोडण्या सुरू झाल्यामुळे पदाधिकारीही जिल्हा परिषदेत येत नसल्याचे सध्या चित्र आहे. गुरुवारी अध्यक्ष बजरंग पाटील हे पालकमंत्री सतेज पाटील यांच्यासोबत प्रचार शुभारंभासाठी गेल्याचे सांगण्यात आले. शिक्षण सभापती प्रवीण यादव ज्यांना नेते मानतात ते डॉ. सुजित मिणचेकर हेदेखील त्याच कार्यक्रमासाठी गेले होते. उपाध्यक्ष सतीश पाटील हेदेखील विरोधी आघाडीच्या कामात आहेत, तर बांधकाम सभापती हंबीरराव पाटील हे सत्तारूढ गटातील अनुराधा पाटील यांच्यासाठी कार्यरत आहेत. त्यामुळे ही निवडणूक होईपर्यंत पदाधिकारीही फार वेळ देऊ शकत नाही. समाजकल्याण सभापती स्वाती सासने या कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे त्यादेखील आठ, दहा दिवस येणार नाहीत.
चौकट
अँटिजेन टेस्ट करणार
मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने यांनी जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांच्या आणि येणाऱ्या अभ्यागतांच्या अँटिजेन टेस्ट करण्याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. योगेश साळे यांच्याशी गुरुवारी चर्चा केली. त्यानुसार या चाचण्यांचेही नियोजन करण्यात येणार आहे.