जिल्हा काँग्रेसचे कोल्हापुरात २३ व २४ आॅक्टोबरला कार्यकर्ता शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 10:46 AM2018-10-22T10:46:14+5:302018-10-22T10:48:47+5:30
काँग्रेस पुन्हा एकदा घराघरांत पोहोचविण्यासाठी नव्या दमाच्या कार्यकर्त्यांची फळी तयार करण्याच्या हेतूने कोल्हापुरात येत्या २३ व २४ आॅक्टोबरला जिल्हा काँग्रेसतर्फे कार्यकर्ता शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आतापर्यंत ६०० कार्यकर्त्यांची नोेंदणी झाली आहे.
कोल्हापूर : काँग्रेस पुन्हा एकदा घराघरांत पोहोचविण्यासाठी नव्या दमाच्या कार्यकर्त्यांची फळी तयार करण्याच्या हेतूने कोल्हापुरात येत्या २३ व २४ आॅक्टोबरला जिल्हा काँग्रेसतर्फे कार्यकर्ता शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आतापर्यंत ६०० कार्यकर्त्यांची नोेंदणी झाली आहे.
फुलेवाडीच्या अमृत मल्टीपर्पज हॉलमध्ये होणाऱ्या या दोनदिवसीय शिबिरासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व सोनल पटेल यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. दिल्लीतून आठ कार्यकर्त्यांचा संच खास मार्गदर्शनासाठी येणार आहे, अशी माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांनी दिली.
कॉँग्रेस कमिटीत आयोजित सेवादलाच्या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना पी. एन. पाटील यांनी सांगितले की, या शिबिरासाठी माजी खासदार, आमदार, जिल्हा परिषद व पंचायत समितीचे आजी-माजी सदस्य, आजी-माजी नगरसेवक, तालुका व ब्लॉक पदाधिकारी, कार्यकर्ते यांना निमंत्रित करण्यात आले आहे.
या सदस्यांना दोन दिवस प्रशिक्षण दिल्यानंतर हे सर्वजण आपापल्या भागांत जाऊन, काँग्रेसची धोरणे सांगून विद्यमान सरकारची फसवणूक उघड करतील, असे या शिबिरामागचे धोरण आहे.
केंद्र व राज्याच्या सरकारच्या कारभारावर आज एकही घटक समाधानी नसल्याचे सांगताना पी. एन. पाटील यांनी या सरकारने शेतकरी, कामगार, उद्योगाची वाताहत केल्याचे सांगितले. शाळा बंद पाडल्या, गोरगरिबांचे शिक्षण अडचणीत आणले. संपूर्णपणे देशाची वाताहत केली आहे. अशा परिस्थितीत काँग्रेस पक्षच यातून मार्ग काढू शकतो, हा विश्वास कार्यकर्त्यांना देण्याची गरज आहे.
विरोधक सत्तेवर आल्यावर देश २० वर्षांनी मागे जातो, हा आजवरचा देशाचा इतिहास आहे. त्याचीच पुनरावृत्ती होत आहे. काँग्रेसने उंचीवर नेऊन ठेवलेला देश आज आर्थिक, सामाजिक अडचणीत सापडला आहे. देश नव्याने उभारण्यासाठी काँग्रेसने आता पुढाकार घेतला आहे. या शिबिरात हाच विचार मांडला जाणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले.