कोल्हापूर, दि. ७ : केरळमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांवर होणाऱ्या हिंसाचाराच्या विरोधात या संघटनेने ११ नोव्हेंबर रोजी चलो केरळ अशी हाक देत राष्ट्रीय स्तरावर महा शांती मोर्चाचे आयोजन केले आहे. या मोर्चात कोल्हापूर विभागातील कार्यकर्ते सहभागी होणार आहेत, अशी माहिती प्रदेशमंत्री राम सातपुते यांनी मंगळवारी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून आतापर्यंत अभाविपच्या शेकडो विद्यार्थी कार्यकर्त्यांवर हल्ले झाले आहेत. माकपची केरळमध्ये सत्ता आल्यापासून या हल्ल्यात कित्येक कार्यकर्ते शहीद झालेले आहेत. याच्या निषेधार्थ देशभरातून ५0,000 कार्यकर्ते तर महाराष्ट्रातून २000 कार्यकर्ते केरळची राजधानी तिरुवनंतपूरम येथे निघणाऱ्या मोर्चात सहभागी होणार आहेत.मु्ख्यमंत्री पिनरायी विजयन यांच्या क्षेत्रात कन्नूर येथे अभाविपच्या सुजित, किम करुणाकरण आणि पी. एस. अनु या परुमाला देवोस्वोम बोर्ड कॉलेजमध्ये शिकणाऱ्या कार्यकर्त्यांना दगडफेक करुन जीवे मारण्यात आल्याचा आरोप सातपुते यांनी केला. दि. १७ सप्टेंबर १९९६ मध्ये नदीतून जीव वाचवण्याचा प्रयत्नात या तीनही कार्यकर्त्यांना आपला जीव गमवावा लागला. या हिेंसेचा निषेध म्हणून अभाविपतर्फे या शांती महामोर्चाचे आयोजन केले आहे.विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन राम सातपुते यांनी केले आहे. यावेळी महानगर मंत्री क्रांती शेवाळे, कोल्हापूर जिल्हा संयोजक श्रीनिवास सूर्यवंशी, भरत रावण, इचलकरंजी विभागाचे चेतन शर्मा, सांगली विभागाचे प्रविण जाधव, संघटनमंत्री साधना वैराळे उपस्थित होते.