कोल्हापूर : गेल्या काही महिन्यांपासून जिल्हा पुरवठा अधिकारी राणी ताटे यांच्या विरोधात कर्मचाऱ्यांमध्ये असलेल्या असंतोषाला बुधवारी वाचा फुटली. पुरवठा विभागातील ५५ कर्मचाऱ्यांनी दुपारपर्यंत काम बंद आंदोलन केले आणि जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्यासमोर तक्रारींचा पाढाच वाचला.तत्कालीन पुरवठा अधिकारी विवेक आगवणे यांच्यानंतर फेब्रुवारी मध्ये राणी ताटे रुजू झाल्या. सुरुवातीचे काही दिवस व्यवस्थित गेल्यानंतर ताटे आणि कर्मचाऱ्यांमध्ये धुसफूस सुरू झाली. कर्मचाऱ्यांना वाईट भाषेत बोलणे, त्यांचे काम जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवणे, वरून विचारणा झाली की कर्मचाऱ्यांच्या नावावर ढकलणे अशा मनमानी कारभाराला कर्मचारी वैतागले आहेत. यापूर्वी त्यांनी तलाठी, तहसिलदार यांनाही अशा पद्धतीची वागणूक दिल्याच्या तक्रारी आहेत.गेल्या सात महिन्यांपासून त्यांच्या या छळवणूकीने सगळे त्रस्त होते, त्यातच मंगळवारी एका कर्मचाऱ्याला रडवून रात्री उशीरापर्यंत थांबण्याची शिक्षा केल्यानंतर कहरच झाला. अखेर बुधवारी सकाळी सगळे एकत्र आले आणि कोल्हापूर जिल्हा महासूल कर्मचारी संघटनेचे सुनिल देसाई व विनायक लुगडे यांच्या पुढाकाराने सर्व कर्मचारी जिल्हाधिकाऱ्यांना भेटले.