कोल्हापूर : येत्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पक्षाची चौकट सांभाळावी. घराच्या बाहेर जाऊन डोकावू नये, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी दिला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहर व ग्रामीणमधील सर्व नगरपालिका, महापालिकेतील नगरसेवकांच्यावतीने पवार यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सपत्नीक शाल, श्रीफळ व तिरुपती बालाजीची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. त्यावेळी पवार बोलत होते. पवार यांचा सत्कार माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते, तर पत्नी प्रतिभाताई पवार यांचा महापौर हसिना फरास यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पवार म्हणाले, ‘ज्यावेळी असे पुरस्कार मिळतात. त्यावेळी आपली जबाबदारी वाढते. त्यातून आपण आणखी वेगाने काम केले पाहिजे. त्याचा लाभ सर्वसामान्य जनतेला मिळाला पाहिजे. कोल्हापूर हे नेहमीच आपलं वाटलं आहे. पुणे, मुंबई, औरंगाबाद, नागपूर या शहरांमध्ये बजाज, टेल्कोसारखे बाहेरून आलेले उद्योग वसले. त्यामुळे त्या शहरांचा विकास झाला. त्यात ती शहरे पुढेही गेली; पण कोल्हापुरातील लोक बाहेरून कोणी येण्याची वाट पाहत नाहीत तर ते स्वत: यश खेचून आणतात व स्वत:च्या पायावर उभे राहतात.’ पवार म्हणाले, ‘स्वातंत्र्यलढ्यात देशात अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली व आंदोलने केली. त्यात काँग्रेसच्याच कार्यकर्त्यांचे योगदान होते. पंडित नेहरूसह इंदिरा गांधी आदींचे कार्य मोठे आहे. आज देशाचे पंतप्रधान काँग्रेस नष्ट करण्याची भाषा करतात. मात्र, त्यांना काँग्रेसचे विचार किती खोलवर रूजले आहेत याची जाणीव नाही. सत्ता देण्याचे काम सर्वसामान्य लोक करतात. त्यामुळे कुणी कुणाला नष्ट करतो म्हटले तरी ते शक्य नाही. विचार हे अमरच राहतात. राष्ट्रवादी काँग्रेस हीसुद्धा अशा विचारांवरच आधारित आहेत. कार्यकर्त्यांच्यादृष्टीने पक्ष म्हणजे घर असते. त्यांनी या घराची चौकट ओलांडून बाहेर डोकावू नये. काही तक्रारी असतील तर त्याबाबत जिल्हाध्यक्ष, माजी मंत्री हसन मुश्रीफ ही मंडळी ती सोडविण्यासाठी कार्यरत आहेत.यावेळी खासदार धनंजय महाडिक, आमदार संध्यादेवी कुपेकर, माजी खासदार निवेदिता माने, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, माजी आमदार के. पी. पाटील, माजी आमदार अशोकराव जांभळे, बाबूराव हजारे, भैया माने, सुरेश पाटील, धैर्यशील माने, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या संगीता खाडे, डॉ. नंदिनीताई बाभूळकर, उपमहापौर अर्जुन माने, अर्बन बँकेच्या संचालिका गीता जाधव आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)कोल्हापूरच्या आॅईल इंजिनची आठवण सन १९६३ मध्ये आंतरराष्ट्रीय परिषदेच्या निमित्ताने इजिप्तला जाण्याचा योग आला. परिषदेनंतर मी त्या परिसरात फिरलो. तेथील इजिप्त नदीच्या काठावर समृद्ध शेती पाहिली. रस्त्यावरून जाताना ‘फटफट’असा आवाज ऐकला व तेथील लोकांना विचारले तर हा आवाज आजूबाजूच्या विहिरींवर शेतीसाठी पाणी खेचण्यासाठी लावलेल्या आॅईल इंजिनचा होता. आणखी उत्सुकता ताणली म्हणून ती इंजिन मी पाहिली, तर ती कोल्हापुरात तयार केलेली होती. त्यानंतर कोल्हापुरात आल्यानंतर माहिती घेतली तर ती म्हादबा मेस्त्री यांनी ती उद्यमनगरातील विश्वास इंजिनिअरिंगमध्ये तयार केली होती. बाहेरून आलेल्या लोकांपेक्षा कोल्हापूरच्या लोकांमधील जिद्द त्यावेळपासून दिसली, अशी आठवणही पवार यांनी सांगितली. कोल्हापुरात शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल पक्षातर्फे माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते तिरुपती-बालाजीची प्रतिमा देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी महापौर हसिना फरास, खासदार धनंजय महाडिक, माजी खासदार निवेदिता माने आदी उपस्थित होते.
कार्यकर्त्यांनी पक्षाची चौकट सांभाळावी
By admin | Published: January 29, 2017 12:34 AM