कोल्हापूर : निवडणुकीत निकाल जाहीर होतील तसे काँग्रेसमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे आमदार सतेज पाटील यांच्या ‘अजिंक्यतारा’ कार्यालयावर गुलालाची उधळण करीत कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष सुरू होता; पण दुसऱ्या बाजूने स्टेशन रोडवरील राष्ट्रीय काँग्रेसच्याच कार्यालयासमोर मात्र सन्नाटा पसरल्याची अवस्था होती.सकाळी दहा वाजता मतमोजणीला प्रारंभ झाला. सकाळी साडेअकरा वाजल्यापासून जसजसे निकाल जाहीर होऊ लागले, तसतसा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू झाला. पहिल्या टप्प्यात काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्या गटाच्या उमेदवारांनी विजयाची मजल मारली. त्यानंतर गुलालाची उधळण करीत, पक्षाचे फडफडणारे झेंडे वाहनांवर लावून कार्यकर्त्यांचे लोंढे जल्लोष करीत दुचाकींचे सायलेन्सर काढून विजयाच्या घोषणा देत ‘अजिंक्यतारा’कडे येऊ लागले. गुलालाची मुक्तपणे उधळण केल्याने ‘अजिंक्यतारा’वर गुलालाचा खच पडला होता. तसेच फटाक्यांची आतषबाजी होत होती. गटाच्या विजयी उमेदवारांची संख्या वाढत जाईल, तसा कार्यकर्त्यांचा जल्लोष वाढत होता. दुपारनंतर विजयी उमेदवार आपल्या समर्थकांसह झेंडे फडफडवत, स्कार्फ गळ्यात अडकवून गुलालाची उधळण करीत वाहनांच्या ताफ्यासह ‘अजिंक्यतारा’वर येत होते. या विजयी उमेदवारांना आलिंगन देऊन त्यांच्या आनंदात इतर कार्यकर्ते सहभागी होत होते. विजयी उमेदवार नेते सतेज पाटील यांना भेटण्यासाठी कार्यालयाच्या इमारतीत जात होते; पण तेथे इमारतीच्या मुख्य कार्यालयात सतेज पाटील उपस्थित नसल्याने येथे या विजयी उमेदवारांचे अभिनंदन व स्वागत ‘गोकुळ’चे माजी अध्यक्ष बाबासाहेब चौगले, माजी नगरसेवक भरत रसाळे, पंचायत समितीचे माजी सदस्य भूजगोंडा पाटील हे करीत होते. (प्रतिनिधी)दोन एलसीडीवर विश्लेषण‘अजिंक्यतारा’ कार्यालयाच्या आवारात दोन भव्य एलसीडी सुरू होते. एका स्क्रीनवर कोल्हापूर जिल्ह्याचे चित्र एस न्यूजवर, तर दुसऱ्या एलसीडीच्या स्क्रीनवर राज्यातील घडामोडींचे चित्रण सुरू होते. हे पाहण्यासाठी कार्यकर्त्यांची गर्दी होती. स्थानिक चित्रण सुरू असताना सतेज पाटील गटाचा एखादा उमेदवार विजयी झाल्याची बातमी दाखविल्यानंतर कार्यकर्ते जल्लोष करीत होते.काँग्रेस कार्यालयात शुकशुकाटएकीकडे सतेज पाटील यांच्या ‘अज्ािंक्यतारा’ या कार्यालयावर गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी करीत कार्यकर्त्यांचा विजयाचा जल्लोष सुरू असताना दुसरीकडे स्टेशन रोडवरील राष्ट्रीय काँग्रेसच्या जिल्हा कार्यालयात मात्र कमालीचा सन्नाटा होता. हीच परिस्थिती दुपारपर्यंत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांच्या राजारामपुरीतील निवासस्थानासमोर होती.
‘अजिंक्यतारा’वर कार्यकर्त्यांचा जल्लोष
By admin | Published: February 24, 2017 12:14 AM