चंदगड : दौलत कारखान्याच्या विक्रीला किंवा चालवायला येणाऱ्या कंपनीला सहकार्य करण्याची भूमिका कामगारांनी घेतली. थकीत कर्जापोटी हलकर्णी (ता. चंदगड) येथील कारखान्याची विक्री करण्याची प्रक्रिया जिल्हा बँकेने सुरू केली आहे. निविदाही प्रसिद्धीस दिल्या आहेत. या प्रश्नावर विचार करण्यासाठी शुक्रवारी कामगार संघटनेची बैठक हलकर्णी (ता. चंदगड) येथील गणेश मंदिरात आयोजित केली होती. त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला.हणमंत पाटील यांनी स्वागत करून कामगारांची आजची स्थिती कथन करून ‘दौलत’ची विक्री झाल्यास काय करावे लागेल याबाबत चर्चा करावी, असे आवाहन केले.यावेळी दौलत कारखाना चार हंगाम बंद असल्याने मशिनरी गंजल्या आहेत. काही पार्ट चोरीला गेले आहेत. त्यामुळे या हंगामात ‘दौलत’ सुरू झाला नाही, तर पुन्हा कधीच सुरू होणार नाही. यासाठी कामगारांचे हक्क शाबूत ठेवून मागील देण्याविषयी जी कंपनी चांगला निर्णय घेईल त्याला पाठिंबा देण्याचा ठराव करण्यात आला.यावेळी ‘सिटू’चे प्रा. डॉ. सुभाष जाधव यांनी कामगारांच्या मागील येण्यासंदर्भात जिल्हा बँकेला निवेदन द्यावे लागणार आहे. यासाठी एक समिती स्थापन करावी लागणार आहे, असे सांगितले.अॅड. संतोष मळवीकर यांनी ‘दौलत’ची वाताहत करण्यात नरसिंगराव पाटील व गोपाळराव पाटील यांचाच हात आहे. ‘दौलत’ राजकारणाचा अड्डा बनविल्याने आजची परिस्थिती निर्माण झाली आहे. कामगार आर्थिक अडचणीत आले. शेतकरी भिकेला लागले. त्यामुळे कामगार, शेतकरी यांच्या हितासाठी जर जिल्हा बँकेने योग्य निर्णय घेतल्यास त्यांना पाठिंबा देऊ, असे सांगितले.यावेळी प्रभाकर खांडेकर, जे. जी. पाटील, प्रदीप पवार, केराप्पा पाटील, एस. आर. पाटील, शिवाजी घोळसे, पांडुरंग पाष्टे यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या.बाबू फगरे, नामदेव कुट्रे, रमेश नाकाडी, गावडू पाटील, नामदेव फाटक, सुरेश सावंत-भोसले, देमाणा पाटील, अनंत पाटील, चंद्रकांत तांबे, मल्लाप्पा केसरकर, धोंडीबा बळजकर, रामचंद्र सांबरेकर, संजय गावडे, मारुती नागुर्डेकर, कॉ. अण्णा शिंदे, विष्णू कडोळकर, राजू पाटील,अर्जुन कुंभार, कामगार उपस्थित होते. कारखाना विक्रीला ‘शेकाप’चा विरोधदरम्यान, कोल्हापूर जिल्हा बँकेच्या ‘दौलत’ विक्रीच्याविरोधात शेतकरी कामगार पक्ष गडहिंग्लज जिल्हा न्यायालयात जिल्हा बँकेविरोधात आव्हान देणार असल्याची माहिती ‘शेकाप’चे जिल्हा संघटक रवींद्र पाटील यांनी दिली. ते म्हणाले, २२० कोटी रुपयाला दौलत विक्री केल्यास यामध्ये जिल्हा बँक, एनसीडीसी, सह्याद्री, नवहिंद पतसंस्था व इतर बँका यांचीच कर्जे फेडली जाणार आहेत. त्यामुळे शेतकरी, कामगार, तोडणी वाहतूकदार यांना काहीच मिळणार नाही. बाजारभावाप्रमाणे अंदाजे ५०० कोटींची ‘दौलत’ची मालमत्ता असताना कवडीमोल किमतीला ही मालमत्ता विक्री करायला शेकाप व सभासद संघटना देणार नाही.
‘दौलत’ विक्रीला कामगारांचा पाठिंबा
By admin | Published: August 08, 2015 12:43 AM