कोल्हापूर : ‘नमामि पंचगंगा’ कार्यक्रमांतर्गत करवीर, शिरोळ आणि हातकणंगले तालुक्यांतील प्रयाग चिखली ते नृसिंहवाडी दरम्यानच्या पंचगंगा प्रदूषणास कारणीभूत असणाºया २४ गावांमध्ये विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. १५ सप्टेंबर ते नोव्हेंबर २०१८ या कालावधीतील या मोहिमेबाबत अधिकाºयांच्या कार्यशाळेचे सोमवारी जिल्हा परिषदेत आयोजन केले होते. अध्यक्षा शौमिका महाडिक यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
केंद्र शासनातर्फे राबविण्यात येणारा ‘स्वच्छता ही सेवा उपक्रम’, ‘पर्यावरणपूरक गणेशोत्सव उपक्रम’ आणि ‘नमामि पंचगंगा’ उपक्रमांतर्गत ही कार्यशाळा घेतली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, बांधकाम सभापती सर्जेराव पाटील, महिला सभापती वंदना मगदूम, अधिकारी सुषमा देसाई, राजेंद्र भालेराव, सोमनाथ रसाळ, राजेंद्र भालेराव, एम. एस. बसर्गेकर उपस्थित होते. पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रियदर्शिनी मोरे यांनी प्रास्ताविक केले.
या तीनही उपक्रमांतर्गत स्वच्छतेबाबत जनजागृती, श्रमदानाद्वारे प्रत्यक्ष स्वच्छता, स्वच्छतेची शपथ, स्वच्छता सभा, शौचालय बांधकाम तसेच शौचालय दुरुस्ती असे विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. यावेळी उपस्थितांनी स्वच्छतेची शपथ घेतली. मागील तीन वर्षांमध्ये पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून, यावर्षीही ग्रामपंचायत स्तरावर हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी उपस्थितांना जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक विजय पाटील यांनी आवाहन केले.जिल्हा परिषदेमध्ये सोमवारी आयोजित कार्यशाळेत अध्यक्षा शौमिका महाडिक यांच्यासह वंदना मगदूम, अमन मित्तल, सुषमा देसाई, प्रियदर्शिनी मोरे यांनी स्वच्छतेची शपथ घेतली.