इंदुमती गणेश ।अमेरिकेतील पोर्ट्रेट सोसायटीच्या वतीने शिल्पकार किशोर पुरेकर यांना ‘सिग्नेचर स्टेटस’ हा सन्मान मिळाला आहे. हा सन्मान मिळालेले ते भारतातील पहिले शिल्पकार आहेत. हा गौरव केवळ एका कलाकाराचा नाही, तर कोल्हापूर स्कूल नावाच्या परंपरेचा, येथील दर्जेदार कलाकृतींचा आहे. अशा सन्मानामुळे जगभरातील कॅनव्हास कलाकारांसाठी खुला होतो. या निमित्ताने पुरेकर यांची घेतलेली ही चर्चेतील मुलाखत...
प्रश्न : या सन्मानाचे विशेष महत्त्व काय?उत्तर : संस्थेच्या वतीने दरवर्षी या सन्मानासाठी प्रवेशिका मागविल्या जातात. त्यासाठी आपण बनविलेल्या कलात्मक आणि व्यावसायिक अशा सर्व प्रकारांतील १० कलाकृती मी पाठविल्या होत्या. या कलाकृतींचा दर्जा बघून सन्मानासाठी निवड केली जाते. त्यामुळे कलाकृतींसोबतच आपल्यातील कलाकाराचा एक दर्जा मिळतो. हा सन्मान जाहीर झाल्यानिमित्त जागतिक पातळीवरच्या एका मॅगझिनमध्ये माझी मुलाखत छापण्यात आली आहे. जागतिक पातळीवरील विविध प्रदर्शनांमध्ये प्राधान्य मिळते. जगभरातील रसिकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळते. तुमच्या कलाकृतींचा कॅनव्हास अधिक रुंदावतो.
प्रश्न : ‘कोल्हापूर स्कूल’बद्दल काय सांगाल?उत्तर : राजर्षी शाहू महाराजांनी दिलेल्या राजाश्रयामुळे कोल्हापूरला चित्र-शिल्प कलाकारांची फार मोठी परंपरा लाभली आहे. वास्तववादी शैलीतील कलाकृती हे कोल्हापूरचे वैशिष्ट्य आहे. एका गल्लीत किमान चार घरे चित्रकार, शिल्पकारांची असतात. इथे कलाकारांची खाण आहे. व्यावसायिकदृष्ट्या करिअर हा कलेचा वेगळा भाग झाला; पण स्वत:मधील कलाकाराच्या आनंदासाठी कलाकृती घडविल्या जातात. जागतिक पातळीवरील संस्थांना अपेक्षित असलेला कलात्मक दर्जा कोल्हापूरने टिकून आहे.
प्रश्न : कलेच्या क्षेत्रात समाजमाध्यमाची भूमिका कशी आहे?
उत्तर : इंटरनेटच्या माध्यमातून आता जग इतके जवळ आले आहे की, केवळ एका मेलवर तुम्ही कलाकृती पाठवू शकता. याच माझ्या १० कलाकृती प्रत्यक्षात अमेरिकेत नेणे, आणणे प्रवास हा सगळा खर्च झेपण्यासारखा नसतो; त्यामुळे समाजमाध्यमं ही जगभरात पोहोचण्याचे एक माध्यम आहे. त्याचा वापर तुम्ही कोणत्या उद्देशाने आणि कशा रीतीने करता, यावर सगळं अवलंबून आहे.
- अत्याधुनिक साधने
चित्रकार-शिल्पकारितेच्या क्षेत्रातही आता अनेक अत्याधुनिक साधने आली आहेत. त्यांच्या साहाय्याने कलाकृती घडतात; पण त्यांना आर्टिस्टिक टच राहत नाही. जेव्हा एखादा कलाकार मनापासून कलाकृती साकारत असतो तेव्हा त्याने आपले सगळे कौशल्य, ज्ञान, अनुभव पणाला लावलेले असते आणि ते कलाकृतीतून झळकते. आर्टिफिशिअल कलाकृतीत हे दिसणार नाही.