कोल्हापूरची सुवर्णकन्या राही सरनोबत हिने काॅमनवेल्थ, जागतिक विश्वचषक नेमबाजी स्पर्धा, आशियाई नेमबाजी स्पर्धा आदींमध्ये सुवर्णपदक पटकावित भारताचा झेंडा जगभरात फडकाविला आहे. तिच्या या कामगिरीची दखल घेत ऑगस्ट २०१६ साली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष बाब म्हणून राहीला उपजिल्हाधिकारी म्हणून थेट नेमणूक दिली. सेवा काळात परिविक्षाधीन कालावधी पूर्ण करणे अधिकारी कर्मचाऱ्यांना बंधनकारक असते. त्याला राही ही अपवाद ठरली नाही. तिचा हा कालावधी २०१९ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, तिच्या सातत्यापूर्ण स्पर्धा आणि त्यासाठी लागणाऱ्या सरावासाठी तिला भारतीय नेमबाजी फेडरेशनने आयोजित केलेले सराव शिबिर आणि परदेशात सातत्याने होणाऱ्या स्पर्धेत सहभागी व्हावे लागले. त्यात तिने अत्युच्च कामगिरी करीत सुवर्णपदकाची लयलूट केली. या कालावधीत तिला हा परिविक्षाधीन कालावधी तिला पूर्ण करता आला नाही. त्यामुळे शासनाच्या नियमानुसार हा कालावधी पूर्ण न केल्याबद्दल तिचा पगार रोखण्यात आला. ही बाब तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर घालण्यात आली. त्यानंतर तिला हा कालावधी वाढवून मिळाला. त्यानंतर तिचा हा कालावधी विभागीय आयुक्तांनी वाढवून दिला. पुन्हा तिच्या व्यस्त स्पर्धा, सरावामधून वाढवून दिलेला कालावधीही तिला पूर्ण करता आला नाही. त्यानंतर ही २०२० मध्ये तिला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कालावधी वाढवून दिला. जागतिक विश्वचषक स्पर्धा गाजवित असली तरी पगार मिळणे गरजेचे आहे, असे मत क्रीडाप्रेमींकडून व्यक्त होत आहे.
जमिनीवर पाय असलेली सुवर्णकन्या
एखाद्या खेळाडूने जर इतकी पदके मिळवून देशाचा झेंडा अटकेपार केल्यानंतर त्याच्या वागण्यात आणि स्वभावात फरक पडतो. मात्र, राही या सर्वाला अपवाद ठरली आहे. विशेष म्हणजे हा कालावधी मला सरकारने माफ करू नये, हा मी पूर्ण करणार आहे. कामाचा अनुभव माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. या परिविक्षाधीन कालावधीमधून सूट नको आहे. कारण भविष्यात मला ही नोकरी करून बढतीही मिळवायची आहे. त्याकरीता अनुभवही महत्त्वाचा आहे. असेही ती याबाबत बोलताना आवर्जुन सांगते.
(राही सरनोबतचा संग्रहीत फोटो वापरणे)