कोल्हापूर : जागतिक तापमानवाढीमुळे हवामानात बदल होत आहेत. निसर्गचक्र आणि ऋतुचक्रही बदलत आहे. याचा मानवी जीवनावर थेट परिणाम होताना आज दिसत आहे. कोरोना काळात ऑक्सिजन विकत घ्यावा लागत आहे आणि तोही मिळत नाही, अशी स्थिती असताना या वसुंधरा दिनाच्या निमित्ताने हे चित्र अजूनही बदलता येऊ शकते. रस्ते विकास प्रकल्पासह विविध ठिकाणी होणारी बेसुमार वृक्षतोड थांबविता येईल, असे मत निसर्गप्रेमी, वनस्पतीतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
जागतिक तापमानवाढीला कार्बनडाय ऑक्साईड कारणीभूत आहे. याचा वाटा ७२ टक्के आहे. यासाठी हवेतील प्रदूषण आणि कार्बनडाय ऑक्साईड वायूचे उत्सर्जन कमी करणे गरजेचे आहे. ते कमी करण्यात वनस्पती, वने, जंगल यांची मदत होते. पश्चिम घाटात ६८ टक्के वनक्षेत्र होते ते आज ३७ टक्के उरले आहे. रस्ते विकास प्रकल्प हे त्यातील एक कारण आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी रस्ते रुंदीकरणासाठी मंजुरी मिळाली आहे. कोल्हापूर-रत्नागिरी, कोल्हापूर-गगनबावडा, गडहिंग्लज-आंबोली, चंदगड-सावंतवाडी अशा अनेक ठिकाणी रस्ते रुंदीकरणाची कामे सुरू होणार आहेत; पण या कामकाजात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होणार आहे. रस्ते अरुंद असल्याने अपघात होत आहेत हे कारण पुढे करून हे रस्ते विकास प्रकल्प सुरू आहेत.
कोट
मोठमोठे देशी वृक्ष तोडून विदेशी वृक्षांची लहान रोपे लावली जातात, यामुळे पर्यावरणाचे व जैवविविधतेचे कधीही भरून न निघणारे नुकसान होते आहे. कमीत कमी वृक्षतोड करून रस्ते विकास प्रकल्प करण्याची मागणी होत आहे. आज रस्ते विकासाची नाही, तर स्वच्छ हवा, तापमान वाढ कमी करणाऱ्या वृक्षांची गरज आहे.
डॉ. प्रा. मधुकर बाचुळकर, वनस्पतीतज्ज्ञ.
सुरू होणारे रस्ते विकास प्रकल्प व होणारी वृक्षतोड
मुंबई ते गोवा महामार्ग (पनवेल ते पणजी) : सुमारे ३१ हजार वृक्षांची होणार कत्तल
कोल्हापूर ते रत्नागिरी महामार्ग (नागपूर ते रत्नागिरी ): ३० हजार वृक्षांची होणार कत्तल
सोनवडे घाट प्रकल्प (मुंबई ते गोवा महामार्ग) : संवेदनशील वनक्षेत्रात २० हजार हेक्टर जंगलतोड, अजून वृक्षतोड होणार