कोल्हापूर : कोल्हापूरची वारसास्थळे व संस्कृती लोकांसमोर आणण्यासाठी जागतिक वारसास्थळ (वर्ल्ड हेरिटेज) सप्ताहाचे मंगळवार (दि. १९) ते २५ नोव्हेंबर या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त विविध स्पर्धा, प्रदर्शन व कार्यक्रम घेण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.जिल्हाधिकारी देसाई म्हणाले, जिल्हा प्रशासन, महापालिका, जिल्हा परिषद, हेरिटेज कॉँझर्व्हेशन कमिटी, क्रिडाई, रोटरी, इस्टिट्यूट आॅफ इंडियन इंटेरिअर डिझायनर्स, आदी संस्थांच्या सहकार्याने या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये कोल्हापूरची वारसास्थळे, संस्कृती लोकांसमोर आणून त्याचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.ते पुढे म्हणाले, या सप्ताहातील प्रमुख कार्यक्रमांमध्ये हेरिटेज वॉक, हेरिटेज हंट, जिल्ह्यातील १२ तालुक्यांतील वारसास्थळे तसेच वैशिष्ट्ये, संस्कृती यांच्या माहितीचे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात फलक लावण्यात येणार आहेत. त्यासाठी ग्रामीण भागातील वैशिष्ट्यांवर आधारित स्पर्धा, वारसास्थळ वास्तूबाबत छायाचित्र स्पर्धा व प्रदर्शन, जिल्ह्याची पारंपरिक पाककृती, खाद्यसंस्कृतीवर आधारित खाद्यमहोत्सव होणार आहे.
हेरिटेज वॉक हे सकाळी आठ ते १० व दुपारी चार ते सायंकाळी सहा असे दोन सत्रांत होणार आहे. हेरिटेज हंटसाठी रेसिडेन्सी क्लबसह १० ठिकाणे निवडण्यात आली असून, त्यासाठी क्लू देण्यात आले आहेत. त्यानुसार ही १० ठिकाणे पूर्ण करणाऱ्याला विजेता घोषित करण्यात येईल.
याबरोबरच २५ नोव्हेंबरला जिल्ह्यातील वारसास्थळांचे जतन आणि संवर्धन करणाऱ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. तसेच सप्ताहानिमित्त आयोजित केलेल्या विविध स्पर्धांतील विजेत्यांना पारितोषिके तसेच कोल्हापूर जिल्ह्यासाठी योगदान देणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचाही सत्कार करण्यात येणार आहे.यावेळी महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, आर्किटेक्ट अमरजा निंबाळकर, ‘क्रिडाई’चे अध्यक्ष विद्यानंद बेडेकर, सचिव रवी माने, आदी मान्यवर उपस्थित होते.
खासगी ११ वारसास्थळांचाही समावेशजिल्ह्यात एकूण तीन हजार वारसास्थळे असून, त्यांतील ७४ ठिकाणांची निवड या सप्ताहासाठी करण्यात आली आहे. त्यामध्ये ११ खासगी वारसास्थळांचाही समावेश करण्यात आला असून, संबंधितांशी पत्रव्यवहारही करण्यात आला आहे. सप्ताहानिमित्त शाहू स्मारक भवन येथे ४० मिनिटांची वारसास्थळांसंदर्भातील चित्रफीतही दाखविण्यात येणार आहे. दरम्यान, मर्दानी खेळ व पोवाड्यांचेही सादरीकरण होईल, असे अमरजा निंबाळकर यांनी सांगितले.