डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या मुंबईतील सिद्धार्थ कॉलेजमध्ये आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या वेबिनारमध्ये ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर सुभाष देसाई यांनी ‘सिद्धार्थ गौतम बुद्ध यांच्या संदेशाची आज गरज’ या विषयावर एक तासभर विचार मांडून श्रोत्याना
मंत्रमुग्ध केले.
या बेबिनारचे सूत्रसंचालन डॉ. सीमा घोष, बुद्धवंदना डॉ. चंदन, प्रास्ताविक डॉ.व्ही.व्ही. गर्जे, प्राचार्य राव, डॉ. बी. डब्ल्यू गायकवाड यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.
डॉक्टर सुभाष देसाई यांनी आपल्या व्याख्यानात ‘भारताच्या सद्य:स्थितीचा आढावा घेताना धर्म आणि जातीपातीमध्ये देश दुभंगला आहे, असे मत नोंदवले. अशावेळी साऱ्यांची मने जोडणारा, जाती-धर्माच्या पलीकडचा बुद्ध धर्म मार्गदर्शक ठरतो. गौतम बुद्धांनी एकही ओळ लिहिली नाही किंवा जाहीर व्याख्याने दिली नाहीत, पण वयाच्या ऐंशीव्या वर्षापर्यंत ते फिरत राहिले आणि आपल्या अनुभूतीवर आधारित संदेश देत राहिले त्यामुळेच दोन-अडीच हजार वर्षांनंतरही ते विचार टवटवीत आहेत. सारनाथला बुद्ध धर्मातील चार आर्य सत्ये आणि अष्टांग मार्ग त्यांनी सांगितला. तिथून बुद्धधम्माचे चक्र गतिमान झाले आणि त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी दुसरे धम्मचक्र प्रवर्तन घडवून आणले. गौतम बुद्धांनी प्रज्ञा, शील आणि करुणा याचा दिलेला संदेश आपण आचरणात आणण्याची गरज आहे’
राष्ट्रगीतानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.