कोल्हापूर : नेहमीचा अधिवास सोडून चिमण्यांनी सुरक्षित आणि अन्न मिळेल अशा ठिकाणी आपला मुक्काम हलविला आहे, असे मत चिमण्यांच्या अभ्यासकांनी मांडले आहे.
‘जागतिक चिमणी दिवस’ म्हणून २० मार्च हा दिवस ओळखला जातो. देशभरातील सुमारे १५,५०० पक्षी निरीक्षकांनी नोंदविलेल्या नोंदीवरून. ‘स्टेट ऑफ इंडियाज बर्ड २०२०’ हा अहवाल प्रसिद्ध झाला आहे या अहवालात चिमण्या वाढल्याची नोंद असून त्यात शहरी भागात चिमण्या कमी झाल्याचे या निरीक्षणावरून म्हणता येईल, असे मत पक्षी निरीक्षकांचे आहे.
चिमण्यांची चिवचिव कानी पडल्याशिवाय खेड्यातीलच नव्हे तर शहरातील सकाळही कधी उजाडलेली नाही. मात्र, चिमण्यांचा चिवचिवाट शहरात कमी ऐकू येऊ लागला असला तरी ग्रामीण भागात चिमण्यांची संख्या कमी स्थिरच आहे. गेल्या २५ वर्षांत नोंदवलेल्या निरीक्षणांनुसार चिमण्यांनी फक्त आपला अधिवास बदललेला आहे. शहरातील चिमण्यांची संख्या कमी झाली असली तरी गेल्या २५ वर्षांत नोंदवलेल्या निरीक्षणांनुसार त्यांनी फक्त आपला अधिवास बदललेला आहे, असे मत बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे सहायक संचालक डॉ. गिरीश जठार यांनी व्यक्त केले आहे.
अन्न न मिळणे, वाढते प्रदूषण यांबरोबरच शेतात पिकांसाठी मोठ्या प्रमाणात वापरली जाणारी रासायनिक खते आणि कीटकनाशके यांच्यामुळे चिमण्या मोठ्या संख्येने कमी होत आहेत, हे जरी खरे असले तरी तुलनेने ग्रामीण भागात चिमण्यांनी आपले वास्तव्य सोडलेले नाही.
शहरात अन्न मिळत नसल्याने ग्रामीण भागात चिमण्यांनी आपला मोर्चा वळविला आहे. असे असले तरी उसाच्या एक पीकपद्धतीमुळे ज्वारी, वरी, बाजरी, कुटकी, गहू यांसारखी पिके कमी नामशेष होत आहेत. त्यामुळे चिमण्यांना अन्न मिळत नाही. पेरू, जांभूळ, अळू, तोरणे, धामणी, आसुळी, चिकुणी, निळुंबी, म्हेके, नेर्ली, करवंदे, बोर, चिंचा यांशिवाय बांधावरील चिवे, बांबू, बाभूळ, धावडा, भरूळा यांसारखी प्रादेशिक जंगली फळांची झाडे चिमण्यांच्या अन्नाचा नैसर्गिक स्रोत आहे. तो वाढविला पाहिजे, असे मत पक्षीप्रेमी नितीनकुमार काजवे यांनी व्यक्त केले आहे.
कोट
वाढत्या शहरीकरणामुळेही चिमण्यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. विशेषत: शहरांमध्ये मोबाईल टॉवर्समधून होणारे विद्युत चुंबकीय उत्सर्जन, मोबाईलमधील लहरी, सिमेंटच्या घरबांधणीमुळे घरट्यांना जागाच उरलेली नाही. मात्र, त्यांनी आपला मोर्चा ग्रामीण भागात वळवला आहे. चिमण्यांची संख्या स्थिर आहे, ती कमी निश्चितच झालेली नाही.
- डॉ. गिरीश जठार
सहाय्यक संचालक, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी, मुंबई
--------------------------
१९०३२०२१-कोल-हाउस स्पॅरो (छाया : रजत भार्गव)
19032021-kol-house sparrow19032021-kol-house sparrow