चंद्रकांत कित्तुरे ।कोल्हापूर : चालू वर्षी जगभरातील साखर उत्पादन मागणीपेक्षा ४० लाख २३ हजार टनांनी जादा झाले असले तरी येत्या हंगामात मात्र ते तब्बल ५७ लाख ४६ हजार टनांनी कमी राहणार असल्याचा अंदाज कमोडीटीज क्षेत्रातील घडामोडींवर रिसर्च करणाऱ्या आघाडीच्या कंपनीने अहवालात व्यक्त केला आहे. दुष्काळ आणि महापुरासारखी आपत्ती, तसेच वाढती रोगराई यामुळे हे उत्पादन घटणार आहे. मागणी पुरवठ्यातील तफावत लक्षात घेता २०१९-२० च्या हंगामात आंतरराष्ट्रीय बाजारातील साखरेचे दर वधारण्याची शक्यता आहे.
गेल्या दोन वर्षांपासून जगभरात अतिरिक्त साखरेचे उत्पादन झाले आहे. २०१७-१८ च्या हंगामात तब्बल २० कोटी २९ लाख १ हजार टन साखरेचे उत्पादन झाले होते, तर मागणी १८ कोटी ३५ लाख ५९ हजार टन इतकी होती. मागणी पुुरवठ्यातील ही तफावत १ कोटी ९० लाख ३४ हजार टनांची होती. परिणामी जगभरातील दरही घसरले होते. २०१८-१९च्या हंगामात उत्पादनात घट झाली तरी ते अतिरिक्तच होते.
या हंगामात सुमारे १८ कोटी ८५ लाख ५५ हजार टन साखरेचे उत्पादन झाले, तर उपभोग (मागणी) १८ कोटी ४५ लाख ३२ हजार इतकी राहील, असा अंदाज आहे. आगामी हंगामात जगभरातील साखरेचे उत्पादन १८ कोटी ७ लाख ७१ हजार टन तर मागणी १८ कोटी ६५ लाख १७ हजार टन इतकी असेल, असा अंदाज आहे. याचाच अर्थ मागणीपेक्षा साखरेचे उत्पादन ५० लाख ७४ हजार टनांनी कमी राहणार आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात घसरलेले साखरेचे दर वाढून साखर उद्योगाला ‘अच्छे दिन’ येण्याची अपेक्षा साखर उद्योगातील जाणकारांची आहे.
उत्पादन का घटले?साखरेचे दर घटल्याने ब्राझीलने आपला ऊस मोठ्या प्रमाणात इथेनॉल निर्मितीकडे वळविला. त्यामुळे तेथील साखरेचे उत्पादन घटले आहे. भारतात दुष्काळ आणि महापुरामुळे उसाच्या उत्पादनात मोठी घट होऊन येत्या हंगामात साखरेचे उत्पादन २६५ लाख टनांपर्यंतच होण्याची शक्यता आहे.