कोल्हापूर : ‘वर्ल्ड ट्रेड सेंटर’ने पश्चिम-दक्षिण महाराष्ट्रातील कोल्हापूर-सांगली-सातारा या जिल्ह्यांसह कोकण विभागासाठी आंतरराष्ट्रीय व्यापार वृध्दीच्या विशेष योजना राबवाव्यात, अशी मागणी ‘वेस्टर्न महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रीज’ (वेसमॅक) चे अध्यक्ष ललित गांधी यांनी शनिवारी येथे केली.
सेंटरच्या उपाध्यक्षा सुप्रिया हांडा (दिल्ली), सहायक उपाध्यक्ष काशिफ नाजीम (दिल्ली), पुण्याचे मुख्य व्यवस्थापक विजय चौरे, संचालिका स्मिता जोगदंड-पाटील यांच्या शिष्टमंडळाने येथील ‘वेसमॅक’च्या कार्यालयास भेट देऊन चर्चा केली.
कोल्हापूर-सांगली-सातारा येथील इंजिनिअरिंग, ऑटोमोबाईल व फाऊंड्री उद्योग, इचलकरंजी, माधवनगर, विटा या भागातील टेक्स्टाईल उद्योग व या तीनही जिल्ह्यासह कोकण विभागातील कृषिआधारित प्रकिया उद्योगासाठी आंतरराष्ट्रीय व्यापार वृध्दीच्या संधी मिळण्यासाठी ‘वर्ल्ड ट्रेड सेंटर’ने योजना राबवाव्यात असे गांधी यांनी सुचविले. सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त छोट्या शहरांपर्यंत पोहोचून संधी, उद्यमशीलता याचा अभ्यास करून उद्योजकांना नवीन संधी देण्यासाठी प्रयत्नशील आहे. पश्चिम महाराष्ट्र व कोकण विभागातील क्षमतांचा अभ्यास करून या विभागासाठी मदत करण्याची ग्वाही सेंटरच्यावतीने देण्यात दिली.