समीर देशपांडेकोल्हापूर : कोरोनामुळे हातामध्ये रक्तगाठ झाल्याचा जगातील पहिला रुग्ण म्हणून शाहूवाडी तालुक्यातील बांबवडेच्या रुग्णाची नोंद झाली आहे. कोल्हापूरच्या सीपीआर हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार करण्यात आले होते.
सीपीआरमधील राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉक्टरांच्या या सामूहिक कामगिरीची नोंद इंटरनॅशनल जर्नल ऑफ कार्डिओव्हस्क्युलर रिसर्च यामध्ये घेण्यात आली आहे.कोरोनाचा कहर सुरू झाला असताना अगदी सुरुवातीच्या काळात २८ मार्च २०२० रोजी हा कोरोना पॉझिटिव्ह ५२ वर्षांचा पुरुष रुग्ण दाखल झाला होता. सातव्या दिवशी त्याच्या डाव्या हातामध्ये कळा सुरू झाल्या आणि हाताची बोटे काळी पडायला सुरुवात झाली.
हृदयातून शुद्ध रक्ताचा पुरवठा करणाऱ्या तीन मुख्य रक्तवाहिन्यांपैकी एका रक्तवाहिनीमध्ये ही गाठ असल्याने रुग्णाच्या जिवाला धोका होता. त्यामुळे हृदयरोग विभागाला कल्पना दिल्यानंतर सर्व डॉक्टरांनी त्याची तपासणी केली.ही गाठ काढल्याशिवाय पर्याय नव्हता. मात्र कोरोनाच्या काळामध्ये कोरोना रुग्णाची शस्त्रक्रिया कशी करायची याच्या मार्गदर्शक सूचनाही आलेल्या नव्हत्या. अखेर विचारविनिमय करून या गाठीमध्ये पाईप घालून रक्त पातळ होण्याची इंजेक्शन्स देण्यात आली. त्यामुळे ही गाठ विरघळली आणि रक्तपुरवठा सुरळीत झाला.
गाठ असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर केवळ सहा तासांत ही कामगिरी करण्यात आली. यासाठी जर विलंब झाला असता तर पूर्ण हात काळा पडून तो काढण्याची वेळ आली असती.ही सर्व माहिती संकलित करून ही केस स्टडी आंतरराष्ट्रीय जर्नलकडे पाठविण्यात आली. तोपर्यंत अशा पद्धतीने हातामध्ये गाठ झाल्याचा एकही प्रकार संबंधित जर्नलकडे नोंदवण्यात आलेला नव्हता. त्यामुळे या कामगिरीची दखल घेत याबाबतचे संशोधन प्रसिद्ध करण्यात आले आहे.यांनी हाताळली परिस्थितीहा रुग्ण दाखल झाल्यानंतर तत्कालीन डीन आणि रेडिओलॉजिस्ट डॉ. मीनाक्षी गजभिये, हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अक्षय बाफना, रेडिओलॉजिस्ट डॉ. स्वेनील शहा, रक्तविकारतज्ज्ञ डॉ. वरुण बाफना, सर्जन डॉ. किशोर देवरे, डॉ. माजिद मुल्ला यांनी या रुग्णावर उपचार केले.आणखी १७ रुग्ण आढळलेमार्चमध्ये हा रुग्ण आढळल्यानंतर आतापर्यंत सीपीआर रुग्णालयामध्ये हातामध्ये रक्ताच्या गाठी झालेले १८ कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले आहेत. त्यांचीही संपूर्ण माहिती या जर्नलकडे पाठविण्यात आली आहे.