कोल्हापूर : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे शंभराव्या कोल्हापूर चित्रपट व्यवसाय वर्धापनदिनानिमित्त ज्येष्ठ अभिनेत्री शांता तांबे, उपमहापौर संजय मोहिते, ज्येष्ठ कलादिग्दर्शक अशोक. जी. पेंटर व महामंडळाचे अध्यक्ष मेघराजराजे भोसले यांच्या हस्ते रविवारी खरी कॉर्नर येथील कॅमेरा मानस्तंभ व कलामहर्षी बाबूराव पेंटर व आनंदराव पेंटर बंधूंच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.महाराष्ट्र फिल्म कंपनीची स्थापना १ डिसेंबर १९१९ रोजी खरी कॉर्नर येथे कलामहर्षी बाबूराव पेंटर व आनंदराव पेंटर यांनी केली. हा दिवस कोल्हापूर चित्रपट व्यवसाय दिन म्हणून आजतागायत साजरा केला जातो. यंदा या स्थापनेला शंभर वर्षे पूर्ण झाली.
यानिमित्त बोलताना ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त, ज्येष्ठ दिग्दर्शक सुभाष भुरके, ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले. तर महामंडळाचे अध्यक्ष मेघराजराजे भोसले म्हणाले, मराठी चित्रपटसृष्टीत निर्मितीमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. नवनवीन तंत्रज्ञान विकसित होत आहे. यात अभ्यासून वेगवेगळ्या माध्यमातून चित्रपट बनवावे, असे आवाहनही त्यांनी केले.यावेळी महामंडळाचे उपाध्यक्ष धनाजी यमकर, सह खजानीस शरद चव्हाण, संचालक सतीश रणदिवे, सतीश बिडकर, चंद्रकांत जोशी, अर्जुन नलवडे, सुरेंद्र पन्हाळकर, आण्णा गुंजाळ, महेश पन्हाळकर, शोभा शिराळकर, हेम सुवर्णा, वैशाली राजशेखर, बबिता काकडे, लीला कणसे, आनंदा वारके, श्रीकांत नरूले, विजय शिंदे, अशोक माने, आदी मान्यवर मंडळी उपस्थित होते.