कोल्हापूर : अष्टमीनिमित्त आज, सोमवारी कोल्हापुरातील श्री अंबाबाईची महिषासुरमर्दिनी रूपात पूजा बांधण्यात आली. रात्री सजवलेल्या वाहनातून अंबाबाईची नगरप्रदक्षिणा होणार आहे. गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या भाविकांच्या उच्चांकी गर्दीला सोमवारी ब्रेक लागला. मध्यरात्री अष्टमीच्या जागराचा होम झाल्याने आज मंगळवारी सकाळी ९ वाजता मंदिर उघडेल.शारदीय नवरात्रोत्सवातील सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजे अष्टमी. सात दिवस देव आणि महिषासुर यांच्यामधील युद्धात अष्टमीच्या मध्यरात्री व नवमीच्या पहाटे देवीने महिषासुराचा वध केला. त्याआधी महिषासुराच्या अत्याचाराला कंटाळलेल्या देवांनी विष्णू व शंकर यांच्याकडे गाऱ्हाणे मांडले. सर्व देवतांच्या तेजातून प्रकटलेल्या स्त्री देवतेला सर्वांनी आपआपली शस्त्रे दिली. हिमालयाने सिंह दिला. देवीने केलेल्या सिंहनादामुळे धरणीकंप झाला आणि महिषासुर रागाने वेडा झाला. त्याच्या दैत्य सैन्याचा देवीने संहार केला. हे बघून महिषासुराने रेड्याचे रूप घेतले व देवीच्या सैन्याला त्रास द्यायला सुरुवात केली.
देवीने उसळून रेड्यावर पाय दिला त्याच्या गळ्यावर त्रिशुलाने आघात केला, दैत्य रेड्याच्या तोंडातून बाहेर आल्यावर तलवारीने वध केला. त्यामुळे देवीच्या नवरात्रोत्सवात अष्टमीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणून या दिवशी अंबाबाईची महिषासुरमर्दिनी रूपात पूजा बांधली जाते. ही पूजा गजानन मुनीश्वर, श्रीनिवास जोशी यांनी बांधली.