कोल्हापूर : शारदीय नवरात्रोत्सवाच्या चौथ्या माळेला रविवारी करवीर निवासिनी श्री अंबाबाईची गायत्रीदेवीच्या रूपात सालंकृत पूजा बांधण्यात आली. जुना राजवाड्यातील तुळजाभवानी देवीची गजारूढ रूपात पूजा बांधण्यात आली.पौराणिक संदर्भानुसार श्री गायत्री देवीला वेदमाता असे संबोधले जाते. गायत्री देवीच्या उत्त्पतीच्या कथेची सुरुवात विश्वाच्या निर्मितीपासून होते. जेव्हा बह्मदेवांना विश्वाची निर्मिती करायची होती, तेव्हा त्याचे सुलभीकरण करण्यासाठी त्यांनी दिव्य अशी दैवी स्त्रीशक्ती प्रकट केली, जिचे मूर्त स्वरूप म्हणजेच गायत्री देवी होय. गायत्री देवीची पाच मुखे ही पृथ्वी, जल, तेज, वायू आणि आकाश यांचे प्रतिनिधित्व करतात. ती कमलासनावर विराजमान आहे. तिचे कमळ हे आसन पावित्र्य आणि आध्यात्मिक जागृतीचे प्रतीक आहे.
गायत्रीदेवीला १० हात आहेत. सूर्य हा वैश्विक प्रकाशाचा, तेजाचा व जीवनाचा प्रतीक असून, गायत्री देवी ही त्याच्या तेजाची प्रतिनिधी आहे. गायत्री मंत्राच्या माध्यमातून सूर्याची उपासना केली जाते. विश्वामित्र ऋषींना गायत्री मंत्राच्या तपश्चर्येनेच प्रतिसृष्टी निर्माण करण्याचे सामर्थ्य मिळाले. भागवत पुराणामध्ये गायत्री उपासनेचे वर्णन दिले आहे. श्री गायत्री देवी ही ज्ञान आणि आध्यात्मिक उन्नतीची अधिष्ठात्री देवता असून तिची उपासना ही आध्यात्मिक आणि भौतिक प्रगतीसाठी केली जाते. ही पूजा श्रीपूजक मयूर मुनीश्वर, अरुण मुनीश्वर, सोहम मुनीश्वर, सुकृत मुनीश्वर यांनी बांधली. जुना राजवाड्यातील तुळजाभवानी देवीची गजारूढ रूपात बाळकृष्ण दादर्णे, अमर जुगर, विजय बनकर, सारंग दादर्णे, चंद्रकांत जाधव यांनी पूजा बांधली.
तिरुपती देवस्थानकडून मानाचा शालू अर्पणतिरुमला तिरुपती देवस्थानच्या वतीने आद्यशक्तिपीठ म्हणून करवीर निवासिनी श्री अंबाबाईला रविवारी सकाळी मानाचा शालू अर्पण करण्यात आला. सोनेरी रंगाच्या या शालूची किंमत १ लाख २७ हजार इतकी आहे. तिरुपती देवस्थानचे अधिक्षक बी. शशिधर, त्यांच्या पत्नी एम. जयलक्ष्मी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी शालूचा स्वीकार केला. यावेळी सचिव शिवराज नाईकवाडे, तिरुमला देवस्थानचे कोल्हापूरचे समन्वयक के. रामाराव, सुब्रमण्यम, श्रीदेवी जोशी, प्रल्हाद जोशी, डॉ. कौस्तुभ औरंगाबादकर उपस्थित होते.