कोल्हापूर : शारदीय नवरात्रोत्सवाच्या सप्तमीला आज, गुरुवारी कोल्हापुरातील श्री अंबाबाईची दुर्गादेवी रुपात पूजा बांधण्यात आली. उद्या, शुक्रवारी अष्टमीनिमित्त रात्री साडे नऊ वाजता देवी फुलांनी सजलेल्या वाहनात विराजमान होऊन नगरप्रदक्षिणेला निघणार आहे. त्यानंतर रात्री महाकाली मंदिरासमोर जागराचा होम होईल. त्यामुळे शनिवारी सकाळी ८ नंतर मंदिर उघडेल.शारदीय नवरात्रोत्सव आता अखेरच्या टप्प्यात आला आहे. सप्तमीला अंबाबाईने दुर्गादेच्च्या रुपात भक्तांना दर्शन दिले. सर्वश्रेष्ठ निर्गुण परब्रम्हाच्या शक्तीचे माया रुपाचे सर्वप्रथम स्वरूप म्हणजे दुर्गादेवी आहे. सर्व देवतांचे कार्याकारण अवतार जिच्या इच्छेने, जिच्यापासून निर्माण झाले. जिच्या प्रभावाने राहिले. जिच्या स्वरुपात लय पावले तिच महामाया आदिशक्ती दुर्गा आहे. दुर्गा सप्तशती ग्रंथाच्या ११ व्या अध्यायात वर्णन केल्याप्रमाणे मी दुर्गम नावाच्या महापराक्रमी दैवत्याचा वध केल्याने माझे दुर्गा हे नाव प्रध्द्ध पावेल. दु:ख दारिद्रय आणि भय हरण करणारी दुर्गम पिडेचा नाश करणारी याप्रमाणे श्री दुर्गादेवीची स्तुती केली आहे. यात दुर्गेने विविध कारणांनी जे अवतार धारण केले. ते नवदुर्गा म्हणून प्रसिद्ध आहेत. ही अष्टभूजा असून वाघावर बसलेली आहे. ही पूजा विद्याधर मुनीश्वर, अरुण मुनीश्वर, सोहम मुनीश्वर व सुकृत मुनीश्वर यांनी बांधली.नवरात्रोत्सवात अष्टमीला विशेष महत्व असून यादिवशी देवीने महिषासुराचा वध केल्याने रात्री जागर केला जातो. तत्पूर्वी रात्री साडेनऊ वाजता अंबाबाईची उत्सवमूर्ती फुलांनी सजविलेल्या वाहनात विराजमान होऊन नगरप्रदक्षिणेला निघेल. महाद्वार रोड, गुजरी, भवानी मंडपात तुळजाभवानी देवीची भेट, त्यानंतर गुरुमहाराज वाडा, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार मार्गे वाहन मंदिरात परतेल. गरुड मंडपात धार्मिक विधी, विश्रांती झाल्यानंतर अंबाबाईची उत्सवमूर्ती गाभाऱ्यात जाईल. रात्री १२ नंतर महाकाली मंदिरासमोर अष्टमीच्या जागराचा होम होईल. त्यामुळे शनिवारी सकाळी ८ नंतर मंदिर उघडेल.
Navratri 2024: सप्तमीला अंबाबाई दुर्गादेवी रुपात
By इंदुमती सूर्यवंशी | Published: October 10, 2024 5:16 PM