कोल्हापूर : कोल्हापूरच्या जगप्रसिद्ध राजर्षी शाहू छत्रपती खासबाग कुस्ती मैदानात काल, बुधवारपासून सुरू झालेल्या लोकराजा राजर्षी शाहू महाराज कुस्ती स्पर्धेच्या पहिल्या दिवशी महिलांमध्ये अंकिता शिंदेने पुण्याच्या अपेक्षा खांडेकरचा पराभव केला. पुरुषांमध्ये कोल्हापूरच्या महेश वरूटेने सांगलीच्या अभिराज साळोखेस अस्मान दाखविले. कोरोनासह विविध कारणांमुळे गेले तीन वर्षे मैदान न भरल्याने स्पर्धेसाठी मोठ्या प्रमाणात कुस्तीगीरांनी सहभाग नोंदविला. त्यामुळे दीर्घ कालावधीनंतर शड्डूचा आवाज घुमला.
स्पर्धेच्या सुरुवात महिला कुस्तीगीरांच्या पहिल्या फेरीने सुरुवात झाली. हेरवाडच्या श्रावणी शेळकेने गडमुडशिंगीच्या सिद्धी पाटीलचा चटकदार लढतीत पराभव करत विजयी सलामी दिली. पुरुषांमध्ये कराडच्या दिग्विजय जाधवने कोल्हापूरच्या सोमराज चौगुले यास अत्यंत प्रेक्षणीय कुस्तीत पराभूत केले. काटाजोड लढतीत हफ्ता डाव, बॅक थ्रोचा वापर दोघांनी केला. सहाव्या मिनिटाअगोदरच दिग्विजयने सोमराजला चितपट केले. आघाडीची आंतरराष्ट्रीय कुस्तीगीर अंकिता शिंदे (शिंदेवाडी) हिने पुण्याच्या अपेक्षा खांडेकर हिचा अत्यंत अटीतटीच्या लढतीत पराभूत केले. सहा मिनिटांच्या खेळीत दोघींनीही एकमेकांना एकेरी पट काढून चितपट करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात अंकिता वरचढ ठरली. ही लढत अत्यंत तोलामोलाची झाल्याने ही लढत लक्षणीय ठरली.
जिल्हा क्रीडा कार्यालय व कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय तालीम संघ आणि इंडो काऊंट फौंडेशनच्यावतीने स्पर्धेचे उद्घाटन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाला. यावेळी हिंदकेसरी विनोद चौगुले, महाराष्ट्र केसरी नामदेव मोळे, उपमहाराष्ट्र केसरी अशोक माने, महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदचे उपाध्यक्ष संभाजी वरूटे, ज्येष्ठ प्रशिक्षक चंद्रकांत चव्हाण, इंडो काऊंटचे संदीप कुमार, बाबा शिरगांवकर, बाळू पाटील, बाबा महाडीक, सरदार साळोखे, संग्राम कांबळे, गणेश मानुगडे, आदी उपस्थित होते.