कोल्हापूर : समाजाला दिशा देणारी साहित्यकृती श्रेष्ठ असते; यासाठी लेखकांनी व वाचकांनी जगाकडे बघून चिंतन करावे. आपण अशी रचना करा की, अद्यापि कोणी केलेली नाही. दर्जेदार साहित्यनिर्मितीत माणूसपण जागे करणे हाच उद्देश असला पाहिजे, असे प्रतिपादन गोवा विद्यापीठाचे इंग्रजी विभागप्रमुख डॉ. आनंद पाटील यांनी केले.विवेकानंद महाविद्यालयाच्या वाङ्मय मंडळातर्फे आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. वाय. होनगेकर होते.
डॉ. पाटील म्हणाले, सध्या ज्ञानाचे, लेखनाचे पुरस्काराचे राजकारण होत आहे; पण समाजमान्य असणाऱ्या नव्या साहित्यकृतीचेही तितकेच स्वागत होत असते. साहित्यातून सामाजिक बांधीलकी दिसून येते. यासाठी लेखकांनी जगातील सर्व भाषांतील साहित्य वाचले पाहिजे. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. एस. वाय. होनगेकर यांनी लेखक, विचारवंतांची जडणघडण ही मातीतूनच होत असते, त्यासाठी परखडपणे लेखन करून समाजाला प्रेरित करावे, असे आवाहन केले.
मराठी विभागप्रमुख प्रा. बी. के. गोसावी यांनी प्रास्ताविक केले. परिचय प्रा. डॉ. श्रुती जोशी यांनी करुन दिला. वाङ्मय विभागप्रमुख प्रा. डॉ. दीपक तुपे यांनी स्वागत केले. इंग्रजी विभागप्रमुख प्रा. डॉ. पी. ए. पाटील यांनी आभार मानले.