कोल्हापूर : देशभरात कोवीड महामारीत अनेक कुटूंबातील कर्ते पुरुष, महिलांचा मृत्यू झाला. मृत्यू पावलेल्या व्यक्तींनी बँकांकडून घेतलेली कर्जापोटी राहते घर तारण दिले आहे. बँका, पतसंस्था, वित्तीय संस्थांनी मालमत्ता जप्तीच्या नोटीस तगाद्यामुळे अनेक वारसांना बेघर होण्याची वेळ आली आहे. त्यामुळे सरकारने ही कर्जे माफ करावीत. या मागणीसाठी लोकसेवा महासंघाच्यावतीने आज, गुरुवारी शिवाजी पूल पंचगंगा नदी पात्रात उतरून निदर्शने केली.कोवीड काळात अनेक कुटूंबे अर्थिक अडचणीत आली. त्यापुर्वी अनेकांनी घरासाठी, शेतीसाठी,क्रेडीट कार्ड कर्जे घेतली होती. त्यासाठी राहते घर तारण दिले होते. संपुर्ण कुटूंबच अर्थिक अडचणीत आल्यामुळे त्या कर्जाचे हफ्ते वेळत जाऊ शकत नाहीत. तरीसुद्धा अनेक कुटूंबे ही कर्जे भरत आहेत. काही वारसांना तर स्वत:चा उदरनिर्वाह करणे शक्य नाही. अनेक बँका, पतसंस्था, वित्तीय संस्थांनी कर्जाचे हफ्ते थकल्याने मालमत्ता जप्तीची नोटीस बजावली आहे.
त्यामुळे कर्जदारांच्या वारसदारांना बेघर होण्याची वेळ आली आहे. अनेक वारसांना तर आत्महत्या करण्याशिवाय पर्याय राहीलेला नाही. त्यामुळे सरकारने ही कर्जे माफ करावीत. अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना महासंघाने दिले आहे. त्याचाच एक भाग म्हणून महासंघाने गुरुवारी पंचगंगा नदी पात्रात उतरून जल निदर्शने केली. यावेळी संस्थापक अध्यक्ष उत्तम कागले, नम्रता सुतार, रुपाली नारे, नेहा नलवडे, कावेरी मोहण्णावर, योगेश कांबळे, दिपा मोटे, आदी उपस्थित होते.