कोल्हापूर : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि पुरोगामी लेखक प्रा. राजा शिरगुप्पे यांचे आज, मंगळवारी कोल्हापूर येथे निधन झाले. ते ६४ वर्षांचे होते.मूळचे निपाणीचे असलेले शिरगुप्पे हे गेले अनेक वर्षे आजरा येथे वास्तव्यास होते. गेल्या दोन महिन्यापासून त्यांची तब्येत बिघडल्यामुळे त्यांना कोल्हापूरमध्ये रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर राधानगरी रोडवरील सावली केअर सेंटर मध्ये त्यांना ठेवण्यात आले होते. त्यांच्या पश्चात पत्नी प्रा. मीना शिरगुप्पे, चित्रकार मुलगा रोहन, मुलगी अनुजा, सून असा परिवार आहे. निपाणीच्या तंबाखू कामगार चळवळीपासून ते विद्रोही साहित्यापर्यंत वेगवेगळ्या चळवळींशी ते जोडले गेले होते. सातत्याने पुरोगामी विचार मांडणाऱ्या शिरगुप्पे यांचा साधना परिवाराशी जवळचा संबंध होता. सांगली येथील विद्रोही साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. पूर्वेकडील राज्यांचा प्रवास करून त्यांनी साधनांमध्ये दिलेली मालिका चर्चेत आली होती. कोल्हापूर जिल्ह्यातील विविध साहित्यिक आणि सामाजिक उपक्रमांमध्ये ते नेहमीच आघाडीवर असत.
Kolhapur: लेखक, कार्यकर्ते राजा शिरगुप्पे यांचे निधन
By समीर देशपांडे | Published: October 31, 2023 1:41 PM