कोल्हापूर : राज्य महाविद्यालयीन व विद्यापीठीय सेवक संयुक्त कृती समितीचा निर्णय होईपर्यंत लेखणी आणि अवजार बंद आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय शिवाजी विद्यापीठ सेवक संघाने घेतला. त्यामुळे चौथ्या दिवशीही आंदोलन कायम राहून विद्यापीठाचे कामकाज ठप्प झाले.सातवा वेतन आयोग, सुधारित आश्वासित प्रगती योजना पुनर्जीवित करणे व इतर प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी विद्यापीठातील सेवकांनी दि. २४ सप्टेंबरपासून लेखणी आणि अवजार बंदसह ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.
संयुक्त कृती समितीसमवेत सोमवारी सकाळी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सकारात्मक चर्चा केली. या बैठकीचा कार्यावृतांत आणि लेखी स्वरूपातील पत्र उच्च व तंत्र व शिक्षण विभागाच्या संचालकांकडून प्राप्त झाल्यानंतर त्यावर संयुक्त कृती समितीच्या बैठकीत चर्चा होईल. त्यानंतर आंदोलनाबाबत पुढील निर्णय घेण्यात येईल. तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, अशी माहिती सेवक संघाचे अध्यक्ष बाबा सावंत यांनी दिली.प्रवेशव्दार सभेत सेवकांना मार्गदर्शनमंत्री सामंत यांच्यासमवेत झालेल्या बैठकीतील इतिवृतांत विद्यापीठाच्या सर्व सभासदांना देण्यासाठी दुपारी दोन वाजता विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारात सभा घेण्यात आली. त्यात सेवक संघाचे अध्यक्ष सावंत, अतुल एतावडेकर, मिलिंद भोसले, विद्यापीठ ऑफिसर्स फोरमचे संजय कुबल, राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे आनंद खामकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.