कोल्हापूर : महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या अंतर्गत असणाऱ्या सर्व माध्यमिक व प्राथमिक शाळा ३० एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याच्या लेखी सुचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने यांनी शुक्रवारी दिल्या आहेत. मात्र शिक्षकांनी घरूनच विविध माध्यमातून ऑनलाईन शिक्षण सुरू ठेवायचे आहे असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार संचारबंदी असल्याने या शाळा बंद राहणार आहेत. मात्र शाळा बंद असल्या तरी सर्व शिक्षकांनी आपले नियमित अध्यापन तसेच शिष्यवृत्ती, प्रज्ञाशोध परीक्षा, इतर मार्गदर्शन झुम, गुगलमीट, वेबिनारच्या माध्यमातून ऑनलाईन पध्दतीने अध्यापन करावयाचे आहे.
कोणत्याही परिस्थिती विद्यार्थी अध्यापनापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी, ज्या शिक्षकांना कोव्हिड १९ अंतर्गत काम करण्याचे आदेश आले आहेत. त्यांनी आपले कामकाज करून अध्यापनही करावे, मोबाईल बंद ठेवू नये, मुख्यालय सोडू नये, परवानगीशिवाय मुख्यालय सोडल्याचे गंभीर दखल घेवून आपत्ती व्यवस्थापन कायद्यातंर्गत कारवाई करण्यात येणार असल्याचेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.