कोल्हापूर : साडेतीन शक्तिपीठ असलेल्या अंबाबाई मंदिराच्या सुरक्षेच्या कारणास्तव शनिवारी जिल्हाधिकारी अमित सैनी, पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा व आयुक्त पी. शिवशंकर यांनी मंदिराच्या परिसराची पाहणी केली. यावेळी मंदिराच्या चारही दरवाज्यांवर एक्स-रे स्कॅनर बसविणे व त्यासाठी महिला भाविकांसाठी स्वतंत्र सोय करणे, असा निर्णय घेण्यात आला. अंबाबाई मंदिराच्या सुरक्षिततेचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी तथा देवस्थान समितीचे अध्यक्ष डॉ. अमित सैनी यांनी मंगळवारी बैठकीचे आयोजन केले होते. यात आवश्यक त्या सर्व उपाययोजना तातडीने अमलात आणाव्यात. पोलीस प्रशासन, देवस्थान समिती यांनी सुरक्षेबाबतीत दक्ष राहावे, अशा सूचना केल्या. फुल विक्रेते, फेरीवाले यांची अन्यत्र सोय करण्यासाठी संयुक्त पाहणी करून निर्णय घेण्याचे व मंदिराभोवती पार्किंगसाठी अन्य उपाययोजना करता येतील, याची पाहणीचे ठरले होते. त्यानुसार शनिवारी रात्री जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व आयुक्तांनी मंदिर परिसराची पाहणी केली. यावेळी जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनिल देशमुख उपस्थित होते. मंदिरात जाणाऱ्या भाविकांच्या बॅगा, पिशव्या, पर्स तपासण्यासाठी चारही दरवाज्यांवर एक्स-रे स्कॅनिंग मशीन बसविण्याचा निर्णय पुन्हा घेतला. तीन वर्षांत देवस्थान समितीने या मशीनसाठी दोन-तीन वेळा निविदा काढली. मात्र, प्रतिसाद न मिळाल्याने निर्णयाची अंमलबजावणी झाली नाही. मात्र, एक्स-रे स्कॅनर बसवले जाईल, असे पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी स्पष्ट केले. मात्र, या यंत्रणेचा महिला भाविकांना त्रास होऊ नये व त्यांची स्वतंत्र तपासणी करावी यासाठी याच ठिकाणी स्वतंत्र सोय करण्याचा विचार जिल्हाधिकारी अमित सैनी यांनी मांडला. (प्रतिनिधी)
चारही दरवाज्यांवर एक्स-रे स्कॅनर बसविणार
By admin | Published: June 14, 2015 1:51 AM