सत्तेचे टॉनिक कार्यकर्त्याला देऊन पक्ष बळकट करणार : ए. वाय. पाटील
सामान्य कार्यकर्ता ते राष्ट्रवादी काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष असा प्रवास करताना सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून काम करणारे व्यक्तिमत्त्व म्हणून ए. वाय. पाटील यांच्याकडे पाहिले जाते. पक्षाने आपणाला काय दिले याचा ताळेबंद न मांडता, आपण पक्षासाठी काय करू शकतो, ही मनाशी खूणगाठ बांधून गेली आठ वर्षे राष्ट्रवादीची जिल्ह्याची धुरा खांद्यावर सक्षमपणे सांभाळून कार्यकर्त्यांना बळ देणाऱ्या नेतृत्वाचा आज वाढदिवस, त्यानिमित्त त्यांच्याशी साधलेला संवाद...
प्रश्न : काँग्रेससह इतर पक्षांच्या तुलनेत जिल्ह्यात राष्ट्रवादी कमकुवत दिसते?
उत्तर : असे काही नाही. मागील पाच वर्षांत पक्षात काहीसी मरगळ आली होती, ही वस्तुस्थिती आहे. राज्यात सत्ता नसल्याने कार्यकर्त्यांना संधी देता आली नाही. तरीही आमचे नेते ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली पक्षाध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे विचार खेडोपाडी पोहोचवून पक्ष बळकटीसाठी प्रयत्न केला. आगामी काळात करवीर, पन्हाळा, शाहूवाडी, हातकणंगले या तालुक्यांत अधिक लक्ष द्यावे लागणार आहे.
प्रश्न : पक्ष वाढीसाठी आपले नियोजन काय आहे?
उत्तर : राज्यात आघाडीचे सरकार आले आहे, काेरोना संकटामुळे पक्ष बांधणीवर मर्यादा आल्या हे खरे आहे. मात्र, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या माध्यमातून प्रत्येक तालुक्यात पक्षाच्या कार्यकर्त्याला बळ देणार आहे. ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून प्रत्येक तालुक्यात निधी देऊन पक्ष बळकटीसाठी प्रयत्न करणार आहे. त्याचा आराखडा तयार असून, त्याचबरोबर तालुका स्तरापासून जिल्हा स्तरापर्यंत सर्व शासकीय, अशासकीय समित्यांमध्ये निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी देऊन त्यांचा सन्मान केला जाईल.
प्रश्न : ‘गोकुळ’साठी घरातील व्यक्तीला संधी देता आली असती, मात्र आपण कार्यकर्त्याचे नाव पुढे केले?
उत्तर : ए. वाय. पाटील हा तळागाळातून वर आला आहे, सामान्य माणसाने, प्रामाणिक निष्ठावंत कार्यकर्त्यांनी मला समाजकारण व राजकारणात उभे केले. जिल्हा परिषद, पंचायत समिती, बाजार समिती, शेतकरी संघ, भूविकास बँक, भोगावती साखर कारखाना, आदी ठिकाणी कार्यकर्त्यांना संधी दिल्याने तेही माझ्यावर जिवापाड प्रेम करतात. ‘गोकुळ’मध्ये सामान्य कार्यकर्त्यालाच संधी द्यायची हे आपण अगोदरच ठरविले होते. त्यानुसार फिरोजखान पाटील व किसन चौगले हे माझ्या नजरेत होते. चौगलेंना संधी दिली. आगामी काळात फिरोजखान यांना चांगल्या ठिकाणी संधी दिल्याचे पाहावयास मिळेल.
प्रश्न : विधानसभेची आपणास दोन वेळा हुलकावणी मिळाल्याचे शल्य कार्यकर्त्यांच्या मनात आहे. नेतृत्वाने दिलेल्या शब्दाचे काय झाले?
उत्तर : खरे आहे, २०१४ व २०१९ ला मी तयारी केली होती. पक्ष नेतृत्वाने दोन्ही वेळेला आपणास थांबण्याचा सल्ला दिला. मी नेतृत्वाचा आदेश मानणारा कार्यकर्ता आहे. आमचे नेतृत्व प्रगल्भ आहे, त्यांना आठवण करून देण्याची गरज नाही. योग्य वेळी ते माझ्यावर जबाबदारी टाकतील याचा विश्वास आहे.
- सुनील चौगले (आमजाई व्हरवडे)