आॅनलाईन लोकमतकोल्हापूर , दि. १५ : भोगावती साखर कारखान्याच्या निवडणुकीत महाआघाडीला पाठिंबा देण्याचा निर्णय राष्ट्रवादी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी घेतला आहे. आमदार हसन मुश्रीफ यांच्यासोबत शनिवारी जिल्हा बॅँकेत पाटील यांच्यासह प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक झाली. या शिष्टाईनंतर पाटील यांनी तटस्थ राहण्याचा निर्णय बदलत पाठिंबा देण्याचे मान्य केले. महाआघाडीचे पॅनेल बांधणी करताना आपल्या समर्थकांना डावलल्याचा राग ए. वाय. पाटील यांना आहे. त्यामुळे ज्यांना उमेदवारी मिळाली त्यांनीही माघार घेतल्याने गुंता वाढत गेला. याबाबत पाटील नेमकी काय भूमिका घेतात, याबाबत राधानगरीसह संपूर्ण जिल्ह्यात उत्सुकता होती.शुक्रवारी (दि. १४) पाटील समर्थकांची सोळांकूर येथे बैठक होऊन त्यात तटस्थ राहण्याची भूमिका घेण्यात आली. त्यानंतर राष्ट्रवादीअंतर्गत घडामोडींना वेग आला. आमदार हसन मुश्रीफ यांनी थेट सोळांकूर गाठले आणि पाटील यांच्याशी चर्चा केली. तरीही तटस्थ राहण्याच्या भूमिकेवर ते ठाम राहिले. शनिवारी दुपारी मुश्रीफ यांनी पाटील यांना जिल्हा बॅँकेत बोलावून पुन्हा चर्चा केली.यावेळी राधानगरी तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष प्रा. किसन चौगुले, आर. वाय. पाटील, डी. बी. पाटील यांच्यासह राधानगरी तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. मुश्रीफ यांनी समजूत काढल्यानंतर महाआघाडीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर मुश्रीफ यांनी माजी आमदार के. पी. पाटील यांच्याशी चर्चा केली. चौगुलेंनी पाढाच वाचलागेल्या पाच-सात वर्षांत राधानगरी तालुक्यात कारखान्याचे माजी अध्यक्ष धैर्यशील पाटील-कौलवकर यांनी आपल्या गटाला कशी वागणूक दिली, यासह विविध तक्रारींचा प्रा. किसन चौगुले यांनी अक्षरश: पाढाच वाचला.
पाठिंबा; पण स्वत:च्या गाडीतून प्रचार
महाआघाडीला पाठिंबा देण्याचा निर्णय ए. वाय. पाटील यांनी घेतला आहे; पण प्रचार यंत्रणा स्वतंत्र राबवून स्वत:च्या गाडीतून जाऊन प्रचार करू, असे पाटील यांनी बैठकीत सांगितले.