राजाराम लोंढे /कोल्हापूर राष्ट्रवादी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, जिल्हा परिषदेचे सदस्य आनंदराव यशवंत तथा ए. वाय. पाटील यांना अवघ्या दीड वर्षातच एस. टी. महामंडळाच्या संचालक पदावरून पायउतार व्हावे लागले. महायुतीचे सरकार सत्तेवर आल्यापासून आघाडी सरकारच्या काळातील महामंडळांवरील नियुक्त्या रद्द करण्यासाठी हालचाली सुरू होत्या. अखेर महामंडळांच्या संचालकपदाचा कालावधी तीन वर्षांवरून एक वर्ष करण्यात आल्याने पर्यायाने पाटील यांना ‘एस. टी.’तून खाली उतरावे लागले. कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस आघाडी सरकारच्या काळात साडेचार वर्षे विशेष कार्यकारी अधिकारी, विविध शासकीय समित्यांसह महामंडळ नियुक्तीचा घोळ सुरू राहिला. आघाडीच्या या घोळामुळे कार्यकर्त्यांमधून नाराजी व्यक्त होऊ लागली; पण नेहमीप्रमाणे महामंडळ नियुक्तीचे गाजर पुढे करीत दोन्ही कॉँग्रेसनी वेळ मारून नेण्याचा प्रयत्न सुरू ठेवला. लोकसभा निवडणुकीत राज्यात पुरता धुव्वा उडाल्यानंतर दोन्ही कॉँग्रेसच्या नेत्यांना जाग आली आणि शेवटच्या टप्प्यात महामंडळासह विविध समिती सदस्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष व सदस्य यांची पदे रिक्त होती. त्यांतील राष्ट्रवादी कॉँग्रेसने घाईगडबडीत सदस्यांच्या नियुक्त्या केल्या. त्याचबरोबर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राधानगरी-भुदरगडमधील पेच सोडविण्यासाठी ए. वाय. पाटील यांना एस. टी. महामंडळाचे संचालकपद दिले. देवस्थान समितीच्या अध्यक्षपदावर कोणाची वर्णी लावायची याबाबत कॉँग्रेसमधील घोळ शेवटपर्यंत मिटला नाही. अखेर हे पद रिक्तच राहिले. त्यानंतर राज्यातील आघाडीची सत्ता संपुष्टात येऊन महायुतीचे सरकार सत्तेवर आले. आघाडी सरकारने केलेल्या महामंडळांसह विविध समित्यांवरील नियुक्त्या रद्द करण्याची प्रक्रिया युती सरकारने सुरू केली. ए. वाय. पाटील यांचे संचालकपद रद्द करण्यासाठी प्रयत्न सुरू केल्यानंतर त्यांनी न्यायालयात धाव घेऊन काही काळासाठी पद सुरक्षित राखण्यात यश मिळविले. एस. टी. महामंडळाच्या संचालकांची मुदत तीन वर्षांची असते. त्यात बदल करून त्याची मुदत एक वर्ष करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याने ए. वाय. पाटील यांचे पद आपोआपच धोक्यात आले. त्यांना या पदावरून पायउतार व्हावे लागले आहे.
ए. वाय. पाटील ‘एस. टी’तून उतरले
By admin | Published: January 31, 2016 1:20 AM