संदीप बावचे ।जयसिंगपूर : विराट शक्तिप्रदर्शनाने जयसिंगपूर येथे झालेल्या हल्लाबोल सभेच्या निमित्ताने डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी आगामी विधानसभेचे रणशिंग फुंकले आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर साडेतीन वर्षांच्या काळात त्यांनी केलेली तयारी या सभेच्या निमित्ताने दिसून आली. गावागावांत केलेल्या बांधणीमुळेच उत्स्फूर्तपणे या सभेला लोक आले. विक्रमसिंह मैदानावर झालेली गर्दी, शिवाय राष्ट्रवादीला ही जागा देण्यासाठी प्रयत्न करण्याची नेत्यांनी दिलेली कबुली त्यामुळे पहिली फेरी तरी यड्रावकर यांनी जिंकलेली आहे.
स्व. शामराव पाटील-यड्रावकर यांच्यानंतर राष्ट्रवादी पक्षाची खऱ्या अर्थाने धुरा डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकरांनी तालुक्यात सांभाळली आहे. सन २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाने उमेदवारी दिल्यानंतर चौरंगी लढतीत राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना दुसºया क्रमांकाची मते मिळाली. त्यानंतर झालेल्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत ते निवडून आले आणि खºया अर्थाने त्यांना गुलाल लागला. जयसिंगपूर कृषी उत्पन्न बाजार समिती, गोकुळ, जिल्हा परिषद, पंचायत समिती, तसेच ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना अनेक पदापर्यंत पोहोचविले. गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर डॉ. यड्रावकरांनी तालुक्यात यड्रावकर गटाची चांगली बांधणी केली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भाजप सरकारविरोधी पुकारलेल्या हल्लाबोल आंदोलनाच्या निमित्ताने पक्षाची ताकद दाखविण्याची संधी यानिमित्ताने पुढे आल्यानंतर गेल्या साडेतीन वर्षांत गावागावांत पक्षाची केलेली बांधणी हल्लाबोल सभेच्या निमित्ताने गर्दीतून दिसून आली. मंगळवारी राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत विक्रमसिंह मैदानावर झालेल्या गर्दीने ही आगामी निवडणुकीत यड्रावकरांच्या बाजूने असल्याचे संकेत दिले.
हल्लाबोल सभेच्या निमित्ताने तालुक्यातील क्षारपड जमिनीबरोबरच ऊस उत्पादक त्याचबरोबर भाजीपाला पिकविणाºया शेतकºयांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न यानिमित्ताने पुढे आला. यड्रावकर यांनी तालुक्यात २० हजार एकर शेतजमीन क्षारपड बनली आहे. एकरी एक लाख रुपये खर्च केले तर ही जमीन पुन्हा उत्पादनाखाली येईल. यासाठी जिल्हा बँकेतून ११ टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध करून दिले. मात्र, सरकारने क्षारपड सुधारण्यासाठी सबसिडी दिली पाहिजे. भाजप सरकारने आजपर्यंत पोकळ आश्वासन दिले आहे. त्याचा रोष व्यक्त करण्यासाठी हल्लाबोल सभेला ही गर्दी जमल्याचे सांगून ही ताकद राष्ट्रवादीच्या पाठीमागे यापुढेही राहील, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.दोन्ही काँग्रेसची आघाडीसा. रे. पाटील गट व यड्रावकर गट अशा दोन गटांच्या माध्यमातून काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी तालुक्याच्या राजकारणात निर्णायक राहिली आहे. जिल्हा बँक, गोकुळ दूध संघ, बाजार समिती, जिल्हा परिषद, पंचायत समिती, जयसिंगपूर नगरपालिका, आदी निवडणुकीत एकत्रितपणे दोन्ही पक्षाची ताकद दिसून आली आहे.यावेळची संधी सोडायची नाहीसभेच्या निमित्ताने येणाºया विधानसभा निवडणुकीत सत्ता बदल निश्चित होईल. स्व. शामराव पाटील-यड्रावकर यांचे स्वप्न साकारण्यासाठी शिरोळ तालुक्यात राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या मागे राष्ट्रवादी काँग्रेस हिमालयाप्रमाणे उभी राहील. गेल्या दहा वर्षांत यड्रावकर यांनी जनतेसाठी काम केले आहे. त्यामुळे यावेळची संधी सोडायची नाही, असे पाठबळ नेत्यांनी सभेत दिल्यामुळे यड्रावकर गटाचा उत्साह दुणावला आहे. एकूणच हल्लाबोल सभेच्या निमित्ताने पहिली फेरी यड्रावकर यांनी जिंकलेली आहे, असेच म्हणावे लागेल.शाबासकीची थापहल्लाबोल सभेच्या निमित्ताने भाजप व शिवसेना पक्षांवर झालेली टीका व त्यातून सरकारविरोधी जनतेचा रोष नेत्यांनी बोलून दाखविला. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी गावागावांत केलेली बांधणी या गर्दीच्या निमित्ताने दिसून आली. आगामी निवडणुकीसाठी नेत्यांनी दिलेली शाबासकीची थाप व सभेला जमलेली गर्दी यातून यड्रावकर गटाला उभारी देणारी ठरणार आहे.